डोंबिवली एमआयडीसीतील अबुदान केमिकल कंपनीत नेमकं काय घडलं? | पुढारी

डोंबिवली एमआयडीसीतील अबुदान केमिकल कंपनीत नेमकं काय घडलं?

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा – अबुदान केमिकल कंपनी एमआयडीसी फेज २ मध्ये आहे. या कंपनीत दोनच्या सुमारास बॉयलरचे लागोपाठ चार – पाच स्फोट झाले. या स्फोटामध्ये संपूर्ण कंपनी बेचराख झाली. धूर आणि आगीचे लोळ यामुळे फायर ब्रिगेडला कंपनी शिरता आले नाही. त्यामुळे सुरुवातीला या कंपनीत जीवितहानी झाली आहे का याची माहिती अद्याप मिळू शकत नव्हती.

डोंबिवली दुर्घटनेत ४ ठार, ३३ जखमी

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ४ ठार, तर ३३ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या स्फोटामुळे ८ वर्षांपूर्वी याच महिन्यात आणि याच परिसरातील प्रोबेस कंपनीच्या शक्तिशाली स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. स्फोटाची माहिती कळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडचे सात ते आठ बंब दाखल झाले. सुरुवातीला अग्निशामक दलाच्या जवानांना कंपनीपर्यंत पोहोचता पोहोचता येत नव्हते. त्यातच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

प्रोबेस कंपनी घटनेच्या आठवणी झाल्या जाग्या

याच परिसरातील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ रोजी झालेल्या स्फोटात १२ जण मृत्यूमुखी पडून २१५ जण जखमी झाले होते. प्रोबेस कंपनीतील स्फोटाला येत्या २६ मे रोजी ८ वर्षे पूर्ण होणार आहेत. अगदी अगदी अशाच स्वरूपाच्या शक्तिशाली स्फोटात अनुदान केमिकल कंपनी बेचिराख झाली. लागोपाठ एका मागोमाग एक कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांमुळे आसपासचा परिसर हा धरला होता. या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. परिसरातील रहिवासी भयभित होऊन घराबाहेर पडले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेऊन परिसर सील केला होता. त्यामुळे बघ्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे अनेकांनी दुरूनच मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात आगीच्या धुरांचे फोटो क्लिक केले. घटनास्थळी चार-पाच ॲम्बुलन्स दाखल झाल्या. मात्र कंपनीत भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशामक दलाच्या जवानांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे स्फोटग्रस्त कंपनीमध्ये नेमके किती जण अडकले आहेत? ही आग नेमकी कशामुळे लागली याची तांत्रिक माहिती मिळू शकत नव्हती.

आणखी ४ ते ५ कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी

आसपासच्या तीन ते चार कंपन्यांना स्फोटाची झळ बसली. सर्वाधिक झळ लागूनच असलेल्या पेंटस् कंपनीला बसली. त्यामुळे ही आग पसरून आणखी ४ ते ५ कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. १९८६च्या आधीची ही कंपनी आहे. घाटकोपरमध्ये राहणारे केतन मेहता यांच्या मालकीच्या या कंपनीमध्ये थिनर नावाचे केमिकल तयार करण्यात येते. त्यानंतर साठा करून नंतर वितरित विक्रीसाठी इतरत्र करण्यात येते. अत्यंत ज्वालाग्रही थिनर केमिकलचे मोठे टँक या कंपनीत कालच भरून ठेवले होते. बहुदा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे उडालेल्या ठिणग्या या टँकच्या संपर्कात आल्यानंतर टँकचे स्फोट झाले, असा कयास आहे.

८ ते १० किमी. दूरवरील परिसर हादरला

हे स्फोट इतके शक्तिशाली होते की जवळपास ८ ते १० किलोमीटरचा परिसर हादरून गेला होता. सुरूवातीला भूकंप झाल्यासारखे वाटले होते. मात्र एमआयडीसीच्या फेज दोन परिसरातून आग आणि धुराचे लोळ आसमंतात उसळू लागल्यानंतर या परिसरात असलेल्या कंपनीमध्ये आग लागून स्फोट झाल्याचे आढळून आले. या स्फोटाने आसपासच्या अनेक इमारतींचे नुकसान झाले. इमारतींना स्फोटाच्या वेळी मोठे हादरे बसले. एमआयडीसी फेज २ मधील म्हात्रे पाडा, रिजेंसी इस्टेट, एमआयडीसी निवासी विभाग, सोनार पाडा इत्यादी भागात नुकसान झाले. स्फोटातील काही लोखंडी भागांचे अवशेष उडून पडले. स्फोट झालेल्या परिसरातील नागरिक भयभयीत झाले असून असे काही महिन्याच्या अंतराने दुर्घटना होत असल्याने नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसीतील अतीधोकादायक कंपन्या त्वरित येथून हलविण्या त याव्यात, अशी या भागातील जनतेची मागणी आहे.

या दुर्घटनेत एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये २०, तर कल्याण-शिळ महामार्गावरील नेपच्यून हॉस्पिटलमध्ये 9 जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले. यात प्रतिक वाघमारे (३८), राजन घोटणकर (५६), बबन देवकर (४५), रुदांश दळवी (५१), प्रवीण चव्हाण (४१), मधुरा कुलकर्णी (३७), हेमांगी चौके (५६), किशोर विचापुरे (५४) आणि अक्षता पाटील (२४) या ९ जखमींवर नेपच्यून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अंकुश कुंभार (५२), जानकी नायर (४७), रविंद्र कुमार राम (३२), अखिलेश मेहता (३६), सोनू कुमार (२१), शिरीष तळले (62), शिवराम थावळे (४३), शिवम तिवारी (२०), मनोज कुमार (२५) इंद्रपाल भारद्वाज (३४), रीना कनोजिया (२७), राहुल पोटे (३३), सुदर्शन मेहता (३५), मनीषा पोखरकर (४६), प्रिन्स गुप्ता (२७), संजय कुमार महातो (२४), सागर डोहळे (२८), किशोर सावंत (५१), रवी कुमार (२१), तेजल गावित (२३), विकास मेहता (३५), सुजाता कानोजिया (३४), सागर दास (३०) आणि राम चौहान (७०) या २४ जखमींवर डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व जखमी ओमेगा, श्रीनिवास केमिकल, कॉसमॉस कंपनी, डेक्सन कंपनी, पेमको कंपनी, चावरे उद्योग, महाल प्रिंटिंग प्रेस, शक्ती एंटरप्राइजेस, मॉडेल उद्योग, शक्ती एंटरप्राइजेस डेक्कन कलर, राज सन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांतील कामगार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ज्या ठिकाणी कंपनी स्पोर्ट झाला त्या कंपनीच्या शेजारी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मालकीची मॉडर्न गॅस नामक कंपनी आहे. सुरुवातीला भूकंप झाल्यासारखे वाटले, जमीन हादरली, त्यानंतर माहिती मिळताच आपण घटनास्थळी गेलो. पाहणी केली असता आपल्या कंपनीच्या शेजारी असलेल्या अबुदान कंपनीमध्ये स्फोट झाल्याचे आढळून आले. त्यामुळे माझ्या कंपनीतून 4 लिक्वीड ऑक्सिजनचे टँकर बाहेर काढले. सध्या मॉडर्न गॅस कंपनीला कोणताही धोका नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

टेम्पोवाला थोडक्यात बचावला

मुकेश जैन यांच्या एम एच ०३/ सी व्ही/ ७६४३ क्रमांकाच्या टेम्पोवर लोखंडी चॅनल आदळून नुकसान झाले. सुदैवाने या टेम्पोमध्ये कोणीही नव्हते. जवळपास किलोमीटर अंतरावरील एका कंपनीमध्ये लोड करण्यासाठी आला होता. या टेम्पोवर असे दोन लोखंडी चॅनल आदळल्याने टेम्पोचा पुढचा भाग नुकसानग्रस्त झाल्याचे चालक जैन यांनी सांगितले.

हेदेखील वाचा-

Back to top button