ठाणे : कल्याणच्या ऐतिहासिक काळ्या तलावाला संरक्षित स्मारकाचा मिळणार दर्जा | पुढारी

ठाणे : कल्याणच्या ऐतिहासिक काळ्या तलावाला संरक्षित स्मारकाचा मिळणार दर्जा

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  कल्याणच्या निसर्गऋण एन्व्हायर्नमेंट एनजीओ संस्थेने केलेल्या मागणीची पुरातत्व
व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने दखल घेतली आहे. ऐतिहासिक गणल्या जाणार्‍या काळा तलावाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या निकषांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पुरातत्व व
वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी रत्नागिरी विभागाच्या सहाय्यक संचालकांना (पुरातत्व) दिले आहेत. यामुळे कल्याणमधील हेरीटेज वास्तूंच्या जतन-संवर्धनाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पो रेशनकडून कल्याणमधील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या काळा तलावाला
सुशोभीकरणांतर्गत करण्यात येत असलेल्या ऑक्टोगनल जेट्टीच्या बांधकामाला आक्षेप घेण्यात आल्यानंतरही जेट्टीचे काम सुरूच असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सबंधित आक्षेपकर्ते निसर्गऋण एन्व्हायर्नमेंट संस्थेचे दुर्वास चव्हाण यांनी काळा तलाव ऐतिहासिक शहर असल्याची बाब पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या निदर्शनास
आणून दिली. हा तलाव ऐतिहासिक तसेच संरक्षित पुरातत्व वास्तू म्हणून घोषित करण्याची मागणी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे दुर्वास चव्हाण यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

काळा तलावात सुशोभीकरणाअंतर्गत करण्यात येत असलेल्या ऑक्टोगनल जेट्टीच्या बांधकामाला आक्षेप घेण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासन आणि पुरातत्व विभागाने काळा तलाव हेरीटेज वास्तूंच्या यादीत नसल्याचे स्पष्ट
केले होते. महापालिका प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या भोंगळ कारभारामुळे संरक्षित/ हेरीटेज वास्तु या दर्जापासून काळा तलाव वंचित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत एसआयटीकडून तपासणी होऊन काळा तलाव ऐतिहासिक संरक्षित वास्तु म्हणून घोषीत व्हावी व तलाव परिसरात सुरू असलेल्या कामांना बंदी आदेश देण्याची मागणी निसर्गऋण एन्व्हायरोमेंट संस्थेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही केली होती.

ही बाब अत्यंत गंभीर असून महाराष्ट्र शासन, तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन यांच्या असंवेदनशील कारभाराचा अत्यंत क्लेशदायक प्रकार असल्याचे आक्षेपकर्ते निसर्गऋण एन्व्हायर्नमेंट संस्थेचे दुर्वास चव्हाण यांनी म्हटले आहे. कल्याण शहर ही ऐतिहासिक नगरी आहे. कल्याण शहराचा उल्लेख अनेक पुस्तक वजा बखरींमध्ये आढळतो. सुभे कल्याण या विवेकानंद गोडबोले यांच्या पुस्तकात काळा तलाव आणि आसपासच्या परिसराचा उल्लेख आहे.

काळा तलावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

कल्याण शहरातील काळातलाव हा ऐतिहासिक स्थान आहे. पश्चिमेकडील शिवाजी चौकातून भिवंडीकडे जाणार्‍या
रस्त्यावर हा तलाव आहे. कल्याणच्या इतिहासात या तलावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जापूरच्या आदिलशहाने
इ.स. 1506 मध्ये चारही बाजूने दगडी बांधकाम करून हा तलाव बांधला. ते बांधकाम आज अस्तित्वात नाही.

पुढे 1760-70 ला कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी तलावाचा जीर्णोद्धार केला. खापरी नळ्यांद्वारे हे पाणी वाहून नेऊन सुभेदारवाडा आणि सरकारवाड्याला लागून असलेल्या राम मंदिराशेजारील पुष्करणीत (छोटा हौद) सोडले जायचे. काळा तलाव हाच त्याकाळी शहराचा मुख्य जलस्रोत होता. कल्याण हे पूर्वीपासून व्यापारी शहर म्हणून ओळखले जायचे. भिवंडी, पडघा (गांधारी नदीमार्गे) व्यापारी शहरात येत. सरदारांकडेही अनेक जण येत. ते आपले घोडे घोडेखोत आळीत ठेवत व काळातलाव येथे त्यांना पाणी पिण्यासाठी आणत. या तलावाच्या एका काठावर काळी मशीद आहे. त्यावरून तलावाला काळा तलाव असे नाव पडले असावे, असा तर्क बांधला जातो. पूर्वी तेथे वस्ती नव्हती तेव्हा या तलावावर शेन पक्षी येत असत. म्हणून या तलावाला शेनाळे तलाव म्हणून नाव पडले.

 

Back to top button