ठाण्याचे ऐतिहासिक खिडकाळी तलाव विकासाच्या प्रतीक्षेत | पुढारी

ठाण्याचे ऐतिहासिक खिडकाळी तलाव विकासाच्या प्रतीक्षेत

खिडकाळी तलाव ; नूतन बांदेकर :  ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही महत्त्वाच्या ऐतिहासिक धार्मिक स्थळांपैकी एक लोकप्रिय स्थळ म्हणजे श्री खिडकाळेश्वर मंदिर, खिडकाळी. कल्याण फाट्यावरून डोंबिवली, कल्याणकडे जाणार्‍या रस्त्याने निघाल्यावर डोंबिवली हद्द सुरू होण्याच्या अलीकडेच रस्त्यालगत उजव्या बाजूला हे मंदिर आणि मंदिरासमोर दूरवर पसरलेला खिडकाळी तलावाचे संवर्धन काळाची गरज बनली आहे.

खरं तर ठाणे महापालिका हद्दीतील कल्याणच्या दिशेने असलेले शेवटचे गाव म्हणजे खिडकाळी गाव. हा परिसर काहीसा खडकाळ असल्यामुळे त्या भागाचे पर्यायाने गावाचे नाव आणि तलावाचे नाव कालांतराने ते खिडकाळी झाले असावे, असे म्हटले जाते. हे अतिशय रम्य असे हे धार्मिक ठिकाण आहे. श्री खिडकाळेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध पांडवकालीन शिवमंदिर आहे. जाणकारांच्या मते मंदिराची
सध्याची रचना ही 17 व्या शतकात पुनर्विकास करताना करण्यात आली आहे, तर मूळ मंदिर पांडवांनी बांधलेले होते. पांडवांनी त्यांच्या
अरण्यवासात या ठिकाणी भेट दिली, तेव्हा त्यांनी हे मंदिर बांधले होते अशी आख्यायिका आहे. पांडवांपैकी ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर याला भगवान शिवाची पूजा करायची होती आणि पांडवांनी पूजेसाठी जागा म्हणून हे मंदिर बांधले, अशी माहिती मिळते. परंतु येथील महादेवाची पिंडी ही स्वयंभू असल्याचेही सांगितले जाते.

खिडकाळेश्वर मंदिराच्या आवारात श्री हनुमान, श्री गणेश, श्री दत्तात्रय अशा अनेक देवतांच्या प्राचीन काळातील मूर्ती आहेत. त्यापैकी काही छोटेखानी स्वतंत्र मंदिरे अलीकडच्या काळात बांधलेली आहेत. खिडकाळी तलावाकाठी हे सुंदर असे मंदिर आहे, त्यामुळेच या मंदिराला श्री खिडकाळेश्वर मंदिर असे नाव पडले आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून संपूर्ण काळ्या दगडाचे आहे. अलीकडे काही सुधारणा सिमेंट काँक्रीटीकरण करून केलेल्या आढळतात. सन 1934 मध्ये श्री शिवानंद महाराज यांनी मुख्य देवालयाच्या
बाजूलाच जिवंत समाधी घेतली, त्या ठिकाणी समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिर परिसरात अतिशय सुंदर असे उद्यान
आहे. येथे वर्षभर गर्द सावली देणारे वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ, कदंब, कैलासपती असे महाकाय वृक्ष शंभर दिडशे वर्षांपासून उभे
आहेत. त्यामुळे तलावावरून येणारा वारा मंदिर परिसरात स्थिरावतो आणि सावलीमुळे आणखी गारवा देतो.

मंदिराच्या अगदी समोर आडवा पसरलेला तलाव म्हणजे खिडकाळी तलाव. या तलावाचे क्षेत्रफळ साधारणत… 1.7 हेक्टर आहे. पावसाळ्यात तुडुंब भरणारा हा जलाशय अतिशय विशाल रूप घेतो. तर उन्हाळ्यात पाण्याची पातळी काहीशी खालावते. परंतु पूर्णत… कधीही आटत नाही, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तलावामध्ये मोठ्या प्रमाणात कासव, विविध प्रकारचे मासे आणि बदके सुद्धा आहेत.
मंदिरापासून तलावाच्या पलीकडे जाण्यासाठी सुंदर असा पूल बांधलेला असून पलीकडे देखील उद्यान आहे. मधल्या पुलामुळे तलाव
आणखी सुंदर दिसतो. तलावापलीकडच्या परिसरात मरणोत्तर धार्मिक विधी केले जातात. तलाव अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. तलावाचे सुशोभीकरण आणि बांधकाम देखील केलेले आहे. परंतु कारंजे, जलशुद्धीकरण यंत्र या गोष्टी उपलब्ध नाहीत. नौकानयन देखील
कायमस्वरूपी नाही. उद्यानात मुलांसाठी खेळण्याची साधने अद्ययावत नाहीत.सर्व बाजूंनी कठडा आणि वॉकिंग ट ?ॅक बांधलेला
असल्याने संपूर्ण तलावाला आपण फेरी मारू शकतो. एकंदरीतच अतिशय शांत आणि रम्य असा तलाव आणि खिडकाळेश्वर मंदिर परिसर भाविकांना आकर्षित करतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर शिवभक्तांमध्ये या मंदिराला खूप महत्त्व असून ते या मंदिराला भेट देण्यासाठी दूरदूरवरून येतात.
भारतभरातून साधुसंत येथे येत असतात. जपतप, पारायणे सातत्याने सुरू असतात. महाशिवरात्री उत्सव तसेच, प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे फार मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांची गर्दी असते. त्यावेळी मंदिर परिसर सुशोभित करून अतिशय उत्साहात जपजाप्य, पवित्र धार्मिक विधी, होमहवन अशा अनेक गोष्टी होत असतात. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. बाहेरच्या प्रांगणात मोठी जत्रा भरते.
एक मात्र खरे की कधीही गेलो तरी इथे तितकाच प्रसन्न आणि आध्यात्मिक अनुभव येतो. गावातील लोकांकडून गणेशोत्सवादरम्यान खिडकाळी तलावामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. देवदर्शनासाठी बाहेरून येणार्‍या लोकांची ये जा सतत सुरू असते. तसेच एक पिकनिक स्पॉट म्हणूनही हा तलाव आणि मंदिर परिसर सुप्रसिद्ध आहे. बर्‍यापैकी स्वच्छ, सुंदर आणि निसर्गाचे वरदान लाभलेले हे ठिकाण आहे.

गावाच्या वेशीवर असलेल्या या देवस्थानाबद्दल गावकर्‍यांना देखील आस्था आहे. येथे आणखी सुधारणा आणि सोयीसुविधा व्हाव्यात अशी त्यांची अपेक्षा असणे साहजिक आहे. जर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणाचा आणि तलावाचा विकास झाला, तर खिडकाळीचे आणि ठाण्याचे ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिक महत्व नक्कीच वाढू शकते. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी त्या दृष्टिकोनातून विचार होऊन अधिक सुविधा आणि सुशोभीकरण व्हावे, तसेच खिडकाळी तलाव आणि मंदिर यांचे ऐतिहासिक महत्व सर्वसामान्य लोकांनी जाणून घ्यावे. पुढील काळात हा परिसर असाच जपला जाणे गरजेचे आहे.

Back to top button