माता न तू वैरिणी! डोंबिवलीत मुलाला ठार मारणारी निर्दयी सावत्र आई गजाआड | पुढारी

माता न तू वैरिणी! डोंबिवलीत मुलाला ठार मारणारी निर्दयी सावत्र आई गजाआड

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली परिसरात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. पूर्वेकडील पाथर्ली परिसरात गायकवाड वाडीमध्ये राहणाऱ्या सावत्र आईने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाला ठार मारले. अमानुषतेच कळस गाठणाऱ्या घटनेमुळे डोंबिवलीकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी त्या निर्दयी सावत्र आईला गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अंतीमादेवी संजय जैस्वाल (वय 28) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ती गायकवाड वाडीतील सिताबाई निवास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील 10 क्रमांकाच्या खोलीत राहते. या खूनी महिलेच्या विरोधात तक्रार करण्यासाठी मृत मुलाचे वडील व अन्य नातेवाईक कुणीही पुढे आले नाही. आरोपी महिलेलविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी महिलेला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने तिला अधिक चौकशीकरिता चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पाथर्लीतल्या गायकवाड वाडीमध्ये राहणारा कार्तिक संजय जयस्वाल (3 वर्षे 6 महिने) या चिमूरड्याला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास बेफाम मारहाण केली होती. या मारहाणीत तो जबर जखमी झाला. यानंतर उपचाराकरिता खासगी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्याला डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार्तिकच्या सर्वांगावर मारहाणीच्या वेदनादायी जखमा होत्या. रुग्णालय प्रशासनाला कार्तिकच्या मारहाणीबद्दल संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला.

पोलिसांनी कार्तिकच्या मृत्यूची चौकशी सुरू केली. त्याला मारहाण कुणी? का केली? याची सखोल चौकशी करताना पोलिसांना कार्तिक हा अंतीमादेवी जैयस्वाल हिचा सावत्र मुलगा होता. ती त्याचा सतत द्वेष करत असे. काहीना काही निमित्ताने त्याला नियमित अमानुषपणे मारहाण करत होती, असे समोर आले.

संजय यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. सावत्र आई कार्तिकचा जाच करत होती. त्याला सतत मारहाण करत होती. पहिल्या पतीपासून असलेली तिन्ही मुले स्‍वत: जवळ आणायची आहेत. त्यासाठी सावत्र मुलांशी तिचा भयंकर आकस होता. यातच अमानुष मारहाण करून कार्तिकला ठार केले. या निर्दयी सावत्र आईला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कार्तिकच्या निकटवर्तीयांनी केली आहे.

हेही वाचा 

बीड: ‘माझ्या बापाला वाचवा’ म्हणत मुलीने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

मंत्री करण्यासाठी शंकरराव गडाख यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी खोके घेतले; संदीपान भुमरेंचा खळबळजनक आरोप

कोल्हापूर : त्र्यंबोलीच्या भेटीसाठी श्री अंबाबाई गजारुढ रुपात सजली 

Back to top button