शिवसेनेच्या बंडखोरीवरील ‘त्या’ चलतचित्र देखाव्यास उच्च न्यायालयाची परवानगी | पुढारी

शिवसेनेच्या बंडखोरीवरील ‘त्या’ चलतचित्र देखाव्यास उच्च न्यायालयाची परवानगी

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : राजकीय घडामोडींच्या विषयावर गणेशोत्सवात देखावा केल्यामुळे कल्याणमधील गणेश मंडळावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. मंडळाने पोलिसांच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. या पार्श्वूमीवर विजय तरुण मंडळाच्या गणेशोत्सव देखाव्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

सुधारीत ऑडिओ / व्हिडियो क्लिपसह पोस्टर लावण्याचा हुकूम पारित करताना दिलेल्या न्यायालयाच्या परवानगीनुसार देखाव्यात सादर करण्यात आलेला आक्षेपार्ह ऑडिओ आणि देखावा काढून मंडळ आता नव्याने देखावा सादर करणार आहे. पोलिसांनी देखील मंडळाला गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे.

कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रामबाग परिसरात विजय तरुण गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात शिवसेनेत दोन गट पडून जो सत्तासंघर्ष निर्माण झाला त्या बंडखोरीवरील चलतचित्र देखावा तयार केला. मात्र या देखाव्यामुळे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला. या देखाव्यावर बुधवारी गणेश चतुर्थीच्या पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामुग्री जप्त केली. तसेच मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या कारवाईच्या विरोधात मंडळाने मूर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय घेतला.

शिवसैनिकांसह विजय तरुण मंडळाचे संस्थापक विजय साळवी यांनी शासन, पोलीस कारवाईच्या निषेधार्थ गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मंडपासमोर शासनाच्या निषेधार्थ महाआरती करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईला मंडळाने उच्च न्यायालयात बुधवारी आव्हान दिले. न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य ओळखून तातडीने ही याचिका सुनावणीला घेतली. या याचिकेवर न्यायमूर्ती माधव जामदार आणि रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान मंडळ आणि पोलिस अशा दोघांची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली.

या संदर्भात कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांनी सांगितले की, मंडळाच्या देखाव्यातील आक्षेपार्ह ऑडीओ क्लीप काढून टाकण्याचे मंडळाने उच्च न्यायालयात मान्य केले आहे. हे आक्षेपार्ह ऑडिओ क्लीप आणि आक्षेपार्ह देखावा काढून नव्याने देखावा सादर करता येणार आहे. पोलिसांकडूनही गणोशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी सशर्त असल्याचे व पोलीस निरीक्षक होनमाने यांनी सांगितले.

या संदर्भात विजय तरूण मंडळाने दिलेल्या लेखी पत्रकानुसार शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने उपस्थित होते.

ऑडिओ / व्हिडियो क्लिप आणि देखाव्यात पोलिस उपायक्तांनी सुचवल्याप्रमाणे बदल केले असतानाही सदर प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरकारी वकीलांमार्फत काही वाक्य, तसेच पोस्टरवरील चित्रांवर हरकत घेण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या फोटोंना हरकत घेण्यात आली. तसेच मंडपात फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमा लावण्यास हरकत नाही असे सांगण्यात आले. त्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला.

संपूर्ण स्क्रिप्ट आणि पोस्टर यात आक्षेपार्ह काहीच नसून राजकीय मत मांडण्याचा अधिकार आम्हाला घटनेने दिला आहे, परंतु सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन, पोलिस बेकायदेशीर कारवाई करत असल्याचे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. प्रकरणाच्या सुनावणीअंती उच्च न्यायालयाने पोलिसांतर्फे घेण्यात आलेले अवाजवी व बेकायदेशीर आक्षेप फेटाळून लावत ऑडिओ/व्हिडियो क्लिप आणि पोस्टर / कटआऊट यात आणखी काही आक्षेपार्ह गोष्टी असल्यास त्या दूर करून ऑडिओ / व्हिडियो क्लिप व देखावा दाखवणे कसे शक्य होईल हे तपासण्याबाबत सुचना केली.

न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे याचिकाकर्त्यांनी ऑडिओ / व्हिडियो क्लिप व पोस्टरमध्ये बदल करण्यास तयार दर्शवली. त्याप्रमाणे सुधारित ऑडिओ / व्हिडियो क्लिपचे स्क्रिप्ट आणि न्यायालयाच्या सुचनेप्रमाणे सुधार केलेले पोस्टर उच्च न्यायालयात सादर केले. ते स्वीकृत करून त्यावर हुकुम पारित करताना सुधारीत ऑडिओ / व्हिडियो क्लिप तसेच पोस्टर गणेशोत्सव मंडपात लावण्यास न्यायालयाने परवानगी दिली. आता हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी सोमवारी 5 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आले असल्याचे विजय तरूण मंडळाने त्यांच्या पत्रकात म्हटले आहे.

काय होते त्या देखाव्यात ?

विजय तरुण मंडळाने शिवसेनेतील बंडखोरीवर चलतचित्र देखावा उभा केला होता. या देखाव्यात मी शिवसेना बोलते, असे शीर्षक देऊन शिवसेनारुपी वटवृक्षाच्या माध्यमातून शिवसेना आपला राजकीय वाटचालीचा प्रवास ध्वनीमुद्रणातून कथन करते. हे करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय प्रदुषणावर या चलतचित्रात गद्दारांना धडा शिकविण्याची ताकद दे, बुध्दी दे, असे वक्तव्य करण्यात आले होते. शासन प्रमुखाला या देखाव्यात लक्ष्य करण्यात आल्याने शासन पातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली. आता यात बदल करून पुन्हा नव्याने देखावा सादर करण्याचा मंडळाने निर्णय घेतला आहे.

हेही वाचा

 नांदेड : केरुर येथे मोटारसायकल-खासगी बसची धडक; एकजण जागीच ठार 

उपसा सिंचन योजना पावसाचा अंदाज घेऊन चालू करणार : आमदार शहाजीबापू पाटील 

विक्रम सावंत यांचा बेहिशोबी पैसा पतसंस्थेत, ईडीची चौकशी करा : विलासराव जगताप

Back to top button