परभणी : सुहागन शिवारात ११ फूट लांबीचा मादी अजगर पकडला | पुढारी

परभणी : सुहागन शिवारात ११ फूट लांबीचा मादी अजगर पकडला

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: सुहागन (ता. पूर्णा) येथील शिवारातील एका विहिरीच्या दगडी कपारीत ११ फूट लांबीचे व साडेआठ किलो वजनाचे मादी जातीचे अजगर सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने पकडले.

सुहागन येथील शेतकरी बालाजी नामदेव भोसले यांच्या शेतातील विहिरीजवळ अजगराचा वावर होता. बालाजी यांनी याबाबत नांदेड येथील वन्यजीव बहुउदेदशीय सेवाभावी संस्थेचे सर्प अभ्यासक डॉ. विक्रम सारंग व सर्पमित्र नवनाथ सारंग यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या मदतीने विहीरीच्या कपारीतील अजगराला मोठ्या शिताफीने पकडले. अंधार बॅटरीच्या उजेडात अजगराला पकडण्यात आले. यावेळी अजगराची पाच अंडीही सापडली. अजगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

नांदेड वनविभागात अजगराची नोंद करून अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. दरम्यान, अजगर किंवा सर्प आढळून आल्यास डॉ. विक्रम सारंग यांच्याशी (मोबाईल ७०३८३५३१७५) संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

हेही वाचा 

परभणी : ताडकळस येथे टेम्पो-मोटरसायकलची समोरासमोर धडक; एक ठार

परभणी : पिंपळा भत्या येथे एक लाखांची बैलजोडी चोरीला

Back to top button