उपसा सिंचन योजना पावसाचा अंदाज घेऊन चालू करणार : आमदार शहाजीबापू पाटील | पुढारी

उपसा सिंचन योजना पावसाचा अंदाज घेऊन चालू करणार : आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : पावसाचा अंदाज घेऊन तालुक्यातील कॅनॉलला टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याचे नियोजन करून नद्या आणि तलाव भरून घेतले जातील, अशी माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.

सांगोला तालुक्यामध्ये चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. तालुक्यामधील माण नदी व कॅनॉलला पाणी सोडण्यासंदर्भात टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, सांगोला तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. आठवडाभर पावसाचा अंदाज घेऊन टेंभू व म्हैशाळ उपसा सिंचन योजना चालू करून माणनदीमध्ये या योजनेचे पाणी सोडण्यात येणार आहे. माण नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेतले जाणार आहेत. तसेच या उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलला पाणी सोडूनही त्या परिसरातील छोटे मोठे तलाव भरून घेतले जाणार आहेत.

गेल्या दोन वर्षे माणनदीमध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडले होते, या पाण्याचे थकीत बिल शेतकऱ्यांनी भरावे, असे आवाहनही यावेळी शहाजी बापू पाटील यांनी केले. तसेच या योजनेचे वीज बिल शासनाच्या टंचाई निधीतून भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संबधीत मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button