डोंबिवली : ४ कोटी कर्जाच्या आमिषाने ४० लाखांचा गंडा; दोघांना अटक | पुढारी

डोंबिवली : ४ कोटी कर्जाच्या आमिषाने ४० लाखांचा गंडा; दोघांना अटक

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : जमीन खरेदी करण्यासाठी 4 कोटी रुपयांचे कर्ज देतो, असे आमिष दाखवून गरजूकडून 40 लाख रुपये घेऊन पसार झालेल्या टोळीतील दोघा भामट्यांना कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राजेश सखाराम पवार (वय 39) आणि राहुल विलास दाभोळे (वय 35, दोघेही रा. पेठ, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना सांगलीमधून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिरगोंडा नरसगोंडा पाटील (वय 41, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना जमीन खरेदीसाठी 4 कोटी रुपयांची गरज होती. परंतु पैसे नसल्याने त्यांनी कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान त्यांच्या संपर्कात बनावट नावे सांगून अभय अहुजा, संजय, दिनेश कोटीयान व कुणाल नामक त्रिकुटाने कर्ज देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या आमिषाला बळी पडून पिरगोंडा यांनी कल्याण पूर्वेतील एका हॉटेलमध्ये मिटींग घेतली. या मीटिंगमध्ये 40 लाख रक्कम देण्याचे ठरले. त्याप्रमाणे 4 कोटी रुपयांच्या कर्जासाठी 5 टक्के कमिशन व 10 टक्के प्रोसेसिंग फी म्हणून 40 लाख रुपये तिघा संशयितांनी पिरगोंडा यांच्याकडून उकळले.

मात्र, कालांतराने या संशयितांच्या वर्तवणुकीचा पिरगोंडा यांना संशय येऊ लागला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने पिरगोंडा यांनी 18 जुलै रोजी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी तपासचक्रांना वेग दिला. त्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि बोचरे व तपास अधिकारी पगारे यांना पथकासह तपासासाठी सांगलीकडे रवाना केले. या पथकाने तांत्रिक माहितीद्वारे अभय अहुजा व संदीप या नावाने राहत असलेल्या राजेश पवार आणि राहुल दाभोळे यांना सांगलीतून उचलले. शिवाय त्यांच्याकडून फसवणूक केलेल्या रकमेपैकी 10 लाख रुपये रक्कम हस्तगत केल्याची माहिती कल्याण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांनी दिली. भामट्यांच्या या टोळीतील अन्य आरोपींचाही शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button