रत्नागिरी : चार वर्षांनी व्यासपीठ मिळाल्याने गीतेंकडून टीका : आमदार उदय सामंत | पुढारी

रत्नागिरी : चार वर्षांनी व्यासपीठ मिळाल्याने गीतेंकडून टीका : आमदार उदय सामंत

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष शिवसेनेला संपवत आहेत. ही भूमिका सहा महिन्यांपूर्वी शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीच मांडली होती. त्यांचीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे नेली आहे. मात्र, आता भूमिका मांडणारे गद्दार झाले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने यांच्या वाढदिवसाच्या कौटुंबिक सोहळ्यात अनंत गीते यांनी आपल्यावर टीका केली हे खरे आहे. परंतु, ज्यांना चार वर्षांनी व्यासपीठ मिळाले, ते टीकाच करणार असे सांगून कोण काय बोलतंय त्याला आपण किंमत देत नसल्याचा पलटवार माजी मंत्री व आ. उदय सामंत यांनी केला आहे. रत्नागिरी, राजापूर, देवरुख, संगमेश्वरमधील शिवसैनिकांकडून पाठिंबा वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्हाला शिवसेना संपवायची नाही तर ती बळकट करायची आहे. आम्ही सुरुवातीपासूनच आमची भूमिका स्पष्ट करत आलो आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेना संपवतोय असे म्हणणे पूर्णत:चुकीचे आहे. अनेकजण आता टीका करत सुटले आहेत. मात्र, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्याची आम्हाला गरजही वाटत नसल्याचे आ.सामंत यांनी सांगितले. शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही कोकणातील पाच आमदार शिंदे गटात सहभागी झालो आहोत. आमची भूमिका अनेकांना पटली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यातील शिवसैनिकांसह रत्नागिरी, राजापूर, देवरुख, संगमेश्वरमधील शिवसैनिकांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. काहीजण सोबत दिसले कि त्यांना बोलावून दम देण्याचा प्रयत्नही सुरु आहे. परंतु हे फार काळ टिकणार नाही. येत्या दोन महिन्यास सर्वांचे गैरसमज दूर होतील. आता शिवसेना कोण वाढवतोय हे सर्वांना समजेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्याचा दौरा सुरु झाल्यानंतर त्यांना पूर्ण राज्यातून कसा पाठिंबा मिळतो हे सर्वांना पहायला मिळेल. त्यामुळे आता टिका करणार्‍यांकडे लक्ष न देता, विकास कामांकडे लक्ष देणार असल्याचे आ.सामंत यांनी सांगितले.

खेड मतदारसंघात आ. योगेश कदम यांना संपविण्यासाठी राष्ट्रवादीला कोणी जवळ केले. त्यासाठी कोणी बैठका घेतल्या हे सर्वांना माहित आहे. त्यावेळी केवळ बैठकीला हजर राहिल्यामुळे कदम परिवारात मी वाईट झालो होतो असेही आ.सामंत यांनी सांगितले. आता शिवसैनिकांकडून जबरदस्तीने प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. राजकिय पक्षात त्या प्रतिज्ञापत्राला काय किमंत आहे? असा प्रश्न आ.सामंत यांनी उपस्थित केला आहे. प्रतिज्ञापत्र केले म्हणजे कोण भूमिका बदलू शकत नाही, हा अनेकांचा गैरसमज असल्याचेही आ.सामंत यांनी सांगितले.

Back to top button