खर्डी वनपरिक्षेत्रात वृक्षलागवडीसाठी बालमजूरांचा वापर | पुढारी

खर्डी वनपरिक्षेत्रात वृक्षलागवडीसाठी बालमजूरांचा वापर

कसारा : शाम धुमाळ :  शहापूर तालुक्यातील वनविभागात सध्या वृक्ष लागवडीचा उपक्रम वनविभागाकडून घेण्यात येत आहे. दरवर्षी लाखो रुपयांचा निधी वृक्षलागवडीसाठी केला जातो, परंतु याचं सरकारी निधीचा व सरकारी आदेशाचा खर्डी वनपरीक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या शिरोळ, अजनूप केंद्रासह अनेक केंद्रात सरकारी आदेशाची पायमल्ली करून बालमजूरांना खड्डे खोदन्यापासून ते लागवड करण्यापर्यंत वापरले जात असल्याचा प्रकार उठवा अजनूप येथे उघडकीस आला असून वृक्ष लागवडीत देखील मोठा अनगोंदी कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

उठावा अजनूप राऊंड या केंद्रात 27 हजार खड्डे खोदून 27 हजार झाडे लावल्याचा दावा वनविभाग खर्डी याच्याकडून केला जात असला तरी या ठिकाणी प्रत्यक्षात तेवढे खड्डे व वृक्ष लागवड केलेली दिसून येत नाही. दरम्यान या अजनूप उठावा केंद्रात रोजगार मिळावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ किंवा नोंदणीकृत कामगार यांना वन विभागाने खड्डे खोदण्यासाठी व वृक्ष लागवडी साठी बोलवणे अपेक्षित होते. परंतु 27 हजार खड्ड्यात वृक्ष लागवड व खड्डे करण्यासाठी वनविभागाने शिरोळ आश्रम शाळेत शिकणार्‍या व सुट्टीवर घरी आलेल्या लहानग्या मुला मुलींना 7 रु एक खड्डा अशी रोजंदारी ठरवून कामाला लावले.

एक खड्डा व त्यात एक झाड लावून देण्याचे 7 रु.या शाळकरी मुलांना वणविभाग देत असल्याची माहिती कामगार मुलांकडून मिळाली. 10 महिला व 8 ते 10 लहान मुले असे काम करणार्‍या मजुरांना वेठीस धरून 3 दिवसात 27 हजार खड्डे केले व झाडे लावलीत असा दावा वनविभाग करतेय. पण प्रत्यक्षात मात्र तसे काहीही दिसून येत नाही.

दरम्यान शिरोळ, उठावा केंद्रातील फॉरेस्ट गार्ड व अन्य कर्मचारी यांना वनीकारणाच्या कामाबाबत व अल्पवयीन असलेल्या कामगारांबाबत विचारणा केली असता आम्हाला काही माहिती नाही वरिष्ठाना विचारा असे उत्तर मिळाले. तर खर्डी वनपरीक्षेत्रातील अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.

एक वित खड्डा व दगडावर वृक्षलागवड

अल्पवयीन मुलांना खड्डे खोदून त्यांच्याकडून झाडे लावून घेण्यात येत होती. एका झाडाची व खड्ड्यामागे 7 रु मजुरी देण्यात येत होती पण हे काम होत असताना तिथे वनकर्मचारीच हजर नव्हते. त्यामुळे वीत भर खड्डा करून ते झाड लावले जायचे तर काही ठिकाणी दगडावरच झाडे लावली गेली असल्याने मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील बनावट वनीकरण करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

Back to top button