स्मशानात जादूटोणा करणारा बाबा पोलिसांकडून झाला चतुर्भूज | पुढारी

स्मशानात जादूटोणा करणारा बाबा पोलिसांकडून झाला चतुर्भूज

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धेच्या नावाने करणीतून पैसे उकळल्याच्या घटना राजरोसपणे घडत असतानाच. अशाच प्रकारे टिटवाळ्यातील एका भोंदू बाबाने ठाण्यातील एका महिलेसह 6 ते 8 जणांना भूत बाधा व करणीची भिती दाखवून हजारो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पडघ्यानजीक असलेल्या एका गावातील स्मशानात घडली आहे. याप्रकरणी भोंदू बाबावर पडघा पोलिस ठाण्यात विविध कालमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे स्मशानातील भोंदू बाबाच्या जादू टोण्याचा डाव उधळला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुनिल चौबे भगत (बाबा) असे अटक भोंदू बाबाचे नाव असून तो टिटवाळा परिसरात राहत आहे.

तक्रारदार चेतना प्रकाश शिरोडकर ह्या ठाणे पश्चिममधील किसननगर मध्ये कुटुंबासह राहत असून त्या भुर्जीपाव स्टॉल लावून कुटुंबाचा उदरिर्वाह करत आहेत. त्यांची मुलगी प्राची हीचा मुंबईतील चारकोप येथील प्रतिक हडकर याच्याशी 2017 मध्ये लग्न झाले असून त्यांच्या कौटुंबिक वादामुळे प्राची ऑक्टोबर 2024 पासून आई चेतनाकडे माहेरी राहत आहे.

या दरम्यान प्राचीला वारंवार चक्कर येवुन ती आजारीच राहत असल्याने तिच्यावर दवा-उपचार करुन देखील तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तक्रारदार चेतनाने तिच्या परिचयाचे टिटवाळा येथील आरोपी सुनिल चौबे भगत (बाबा) याच्याकडे प्राचीला त्याच्या घरी असलेल्या दरबारात नेले. त्यावेळी आरोपी भोंदू बाबाने डोळे बंद करुन प्राचीबद्दल काही अचूक माहिती सांगितल्याने तक्रारदार चेतनाचा भोंदू बाबावर विश्वास बसला. आरोपी बाबाने प्राचीवरील करणी उतरवायची असल्यास स्मशानात जाऊन उतारा करावयाचे सांगून त्यासाठी 5 हजार रुपये खर्च सांगितला होता.

भोंदुबाबा विरोधात गुन्हा दाखल

सर्वजण 20 एप्रिल रोजी रात्री 12:10 च्या सुमारास स्मशान भुमीमध्ये आले असता सुनिल चौबे (भगत) याने वस्तुंची विधी मांडुन सर्वांना सोबत आणण्यास सांगितलेले फोटो मागवले व विधी ठिकाणी क्रमवार मांडणी करून चेतना व प्राचीला बसण्यास सांगितले व सोबत असलेल्या इतर लोकांच्या हातामध्ये लिंबु देवुन त्यांना थोडे दुर ऊभा राहण्यास सांगुन मंत्र बोलण्यास सुरुवात केली. बाबांचा विधी सुरु असतानाच त्या ठिकाणी कुंभारशिव गावातील 10 ते 12 गावकर्‍यांनी स्मशानातील भोंदू बाबाच्या जादू टोण्याचा डाव उधळल्याने चेतनासह सर्वांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे या फसवणूक प्रकरणी चेतनाच्या फिर्यादीवरून 21 एप्रिल रोजी पडघा पोलिस ठाण्यात भोंदू बाबा सुनील चौबेच्या विरोधात जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button