आता बँका स्वखर्चातून करणार शहराचे सुशोभीकरण | पुढारी

आता बँका स्वखर्चातून करणार शहराचे सुशोभीकरण

भाईंदर : राजू काळे :   मिरा-भाईंदर महापालिकेच्या वाढत्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेत आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील काही विकासकामे शहरातील विकासक, खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली आहे. याखेरीज सरकारी आस्थापनांच्या सीएसआर (कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सीबिलीटी) फंडच्या माध्यमातून शहरातील काही भागांचे सुशोभिकरणाच्या प्रयत्नांना देखील आयुक्तांनी सुरूवात केली आहे. त्याला शहरातील काही सरकारी बँकांनी प्रतिसाद दिला असला तरी सुरुवातीला भारतीय स्टेट बँकेच्या भाईंदर शाखेने शहरातील चार परिसरांच्या सुशोभिकरण स्वखर्चातून करण्याची जबाबदारी उचलल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले.

यावरुन शहराच्या सुशोभिकरणात आता बँकांचाही हातभार लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोव्हिड महामारीच्या कालावधीत पालिकेच्या मर्यादित उत्पन्नातून रुग्णांवर मोफत उपचार करताना पालिकेला अमर्याद खर्च करावा लागत होता. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर अतिरीक्त ताण पडत असताना पालिकेची आर्थिक ताळेबंद सावरण्यासाठी बँकेत ठेवलेल्या मुदतठेवींवर ओव्हरड्राफ्ट घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. त्याला तत्कालिन महासभेने मान्यता दिली. मात्र हा ओव्हरड्राफ्ट टाळण्यासाठी आयुक्तांनी पालिकेच्या उत्पन्नातील महत्वाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या सक्तीच्या वसुलीला सुरुवात केली.

तर कोव्हिडच्या दुसर्‍या लाटेत उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी आयुक्तांनी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती तसेच खाजगी व सरकारी आस्थापनांच्या माध्यमातून अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यांची जुळवाजूळव केली. कोव्हिड महामारी नियंत्रणात आल्यानंतर आयुक्तांनी शहरातील विकासकामांकडे मोर्चा वळवून प्रभारी मुख्य लेखाधिकारी अजित कुळकर्णी, आरोग्य विभागाचे उपायुक्त रवि पवार व उद्यान विभागाचे उपायुक्त संजय शिंदे, अतिरीक्त शहर अभियंता दीपक खांबित यांच्या माध्यमातून शहरातील विकासक, खाजगी कंपन्या व सरकारी आस्थापनांकडे विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागल्याने शहरातील उद्यानांमध्ये वृृक्ष लागवडींसह विविध उद्यानांच्या संकल्पना व पक्षांच्या निवार्‍यासाठी कृत्रिम घरट्यांची संकल्पना खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून राबविण्यात आली.

कारंज्यांमुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडणार
शहरातील धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील मुख्य ठिकाणी विकासकांच्या माध्यमातून कारंजे साकारण्यात आली. या कारंज्यांतून उडणारे पाण्याचे तुषार हवेतील धुळ ओलसर करीत असल्याने वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा यामागे करण्यात आला. तसेच या कारंज्यांमूळे शहराच्या सौंदर्यातही भर पडणार असल्याचे सांगण्यात आले.

सुशोभीकरणाची कामे होणार
यंदा तर शहरातील सरकारी आस्थापनांच्या सीएसआर फंडातून विविध परिसरांचे सुशोभिकरण करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी सुरू केला. त्याला शहरातील काही सरकारी बँकांनी प्रतिसाद दिला असला तरी सुरूवातीला पालिकेने एसबीआय दिलेल्या परवानगीनुसार मीरारोडच्या शांती शॉपिंग सेंटर ते इंदिरा गांधी रुग्णालय, सृष्टी सिग्नल दरम्यानचे दुुभाजके, डॉ. आंबेडकर भवन (नगरभवन), भाईंदर पश्चिम येथील फाटक परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याकडील दुभाजक, भिंत तसेच डिमार्ट परिसराचे सुशोभिकरणाच्या कामाला स्वखर्चातून सुरूवात केल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पालिकेच्या खर्चात बचत करुन शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहराच्या सौंदर्यात भर टाकून शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा देखील प्रयत्न केला जात असुन त्याला विविध आस्थापनांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
– आयुक्त दिलीप ढोले

Back to top button