डोंबिवली : न्यायालयीन कोठडीत आरोपीचा फिट आल्याने मृत्यू | पुढारी

डोंबिवली : न्यायालयीन कोठडीत आरोपीचा फिट आल्याने मृत्यू

डोंबिवली , पुढारी वृत्‍तसेवा : महिलेसोबत अश्लील संभाषण केल्या प्रकरणी एका महिलेने दत्तात्रेय वारके या व्यक्तीविरोधात डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात 5 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला जळगावहून अटक केली. मात्र न्यायालयीन कोठडीत असतानाच त्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आरोपीला फिट आल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो न्यायालयीन कोठडीत मानपाडा पोलीस ठाण्याच्या आयसोलेशन रुममध्ये होता. मात्र सोमवारी पहाटे त्याला फीट आल्याने तो बेशुद्ध पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान दत्तात्रेय याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण?

ठाणे येथे एका बिल्डरकडे कामाला असणाऱ्या दत्तात्रय याने 2013 साली घर विकत देवू यासाठी एका महिलेकडून पाच लाख रुपये घेतले होते. मात्र या महिलेला तो घर आणि घेतलेले पैसेही परत देत नव्हता. यासंदर्भात महिलेने त्‍यांच्याकडे वारंवार तगादा लावला होता. त्‍याने फोनवर महिलेसोबत अश्लील भाषेत वर्तन केले. त्‍यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसाच्या अटकेनंतर त्‍याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

फिट आल्याने बेशुद्ध

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याच्या आधी कोव्हिड रिपोर्ट बंधनकारक आहे. त्यासाठी मानपाडा पोलिसांनी दत्तात्रेयला आयसोलेशन रूममध्ये ठेवले होते. त्याची कोव्हिड चाचणी ही केली होती. मात्र आज पहाटे त्याला फीट आल्याने तो बेशुद्ध पडला. पोलिसांनी तात्‍काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान त्‍याच्या दुर्दैवी मृत्यू झाला. असे मानपाडा पोलीसांनी सांगितले.

हेही वाचा  

Back to top button