दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीत विक्रमी २००% वाढ | पुढारी

दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीत विक्रमी २००% वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दुग्ध-व्यवसायामध्ये दुग्धजन्य पदार्थ दही,पनीरच्या निर्यातीत २०० टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ पर्यंत ३ कोटी अमेरिकी डॉलर्स एवढी निर्यात करण्यात आली. सात वर्षापूर्वी २०१३-१४ मध्ये याच कालावधीत देशातून १ कोटी अमेरिकी डॉलर्स एवढी निर्यात करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.

देशांतर्गत दुग्धजन्य वस्तूंच्या  (Dairy business) निर्यातीत गेल्या पाच वर्षांमध्ये १०.५% चक्रवाढ दराने वार्षिक वाढ झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२१-२२ दरम्यान देशातून १८१.७५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स दुग्धजन्य उत्पादनांची निर्यात करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निर्यातीत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातून वर्षभरात संयुक्त अरब अमीरात मध्ये तब्बल ३९.३४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढी दुग्धजन्य पदार्थाची निर्यात करण्यात आली.

बांगलादेश मध्ये २४.१३ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढी दही, पनीरची निर्यात करण्यात आली. यासोबतच अमेरिकेत २२.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स, भूटान २२.५२ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स, सिंगापूर १५.२७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स, सौदी अरेबिया ११.४७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स, मलेशिया ८.६७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स, कतार ८.४९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स,ओमान ७.४६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि इंडोनेशियात १.०६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची सर्वाधिक निर्यात करण्यात आली. एकूण निर्यातीपैकी ६१ टक्क्यांहून अधिक निर्यात या प्रमुख १० देशांमध्ये करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button