टॅटूने खुनाचा उलगडा! मेहुण्याचा काटा काढण्याच्या नादात ३ संसार उद्ध्वस्त | पुढारी

टॅटूने खुनाचा उलगडा! मेहुण्याचा काटा काढण्याच्या नादात ३ संसार उद्ध्वस्त

अशोक मोराळे, पुणे

मेहुणा त्याच्या बायकोला म्हणजेच आपल्या बहिणीला शिवीगाळ करतो, एवढ्याशा कारणावरून एकाने आपल्या मेहुण्याचाच काटा काढला; पण त्यामुळे बहिणीचा संसार तर उद्ध्वस्त झालाच; पण त्याचा संसारही मोडून पडला. ‘राग अन् भीक माग’ याची प्रचिती आणून देणारी ही घटना…

पुण्यातील सूसखिंडीचा निर्जन परिसर… एकेदिवशी भल्या सकाळी एका व्यक्तीचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह पडल्याची पोलिसांना माहिती मिळाली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविली जाईल, असा एकही पुरावा पोलिसांना मिळून आला नाही. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्यापासून ते खुन्याला बेड्या ठोकण्यापर्यंतचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाचे अतिशय बारकाईने निरीक्षण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी मृताच्या एका हातावर कसला तरी टॅटू काढल्याचे दिसून आले. ओळखीचा तेवढा एकच काय तो पुरावा होता; मात्र मृत व्यक्तीच्या हातावरील टॅटू आणि त्यांच्या अंगावरील शर्टाने अखेर खुन्याला बेड्या ठोकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मृत व्यक्तीच्या शरीराची पाहणी केली असता त्याच्या हातावर ‘एस’ नावाचा टॅटू होता, तर अंगावर एका मॅरेथॉन स्पर्धेतील टी शर्ट घातलेला होता. तेवढ्या दोन ओळखीच्या खुणांवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी मृताच्या अंगावरील टी शर्टचा फोटो काढून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले होते. पॅन कार्ड क्लब परिसरात पोलिस माहिती काढत असताना, असा शर्ट घालणारा एक माणूस येथील परिसरात राहत असल्याचे काहीजणांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याचे घर शोधून काढून मृत व्यक्तीबाबत माहिती विचारली. त्यावेळी घरच्यांनी तो रात्रीपासून घरी आला नसल्याचे सांगितले. पोलिसांनी मृतदेहाच्या हातावरील टॅटू घरच्या लोकांना दाखविला. तेव्हा तो संदीप शिंपी असल्याचे घरच्यांनी सांगितले. मृतदेहाची ओळख तर पटली; पण त्याचा खून कुणी आणि का केला? याचा शोध घेणे आवश्यक होते. त्यानुसार पोलिसांनी आपले खबरी कामाला लावून तो रात्री कोणाबरोबर गेला होता याची माहिती काढली. तेव्हा एका बुलेटवाल्याचा सुगावा लागला.

पोलिसांनी या बुलेटवाल्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपली बुलेट रात्री आपले मित्र सतीश आणि दीपक हे दोघेजण घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना पद्धतशीरपणे पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून अखेर या खुनाचा उलगडा झाला.

संदीप शिंपी हा त्याच्या बायकोला म्हणजेच सतीश याच्या बहिणीला दारू पिऊन सतत मारहाण करून शिवीगाळ करत होता. तसेच सतीश याच्या घरच्यांनादेखील दारूच्या नशेत शिवीगाळ करून दमदाटी करत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचा हा प्रकार वाढला होता. सतत होणार्‍या त्रासामुळे सतीश याने आपला मेहुणा संदीप शिंपी याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने त्याचा साडू भाऊ दीपक याला सोबत घेतले.

घटनेच्या दिवशी रात्री सतीश आणि दीपक यांनी संदीपला भरपूर दारू पाजली. दारू पिल्यानंतर संदीप याला दुचाकीवर बसवून सुसखिंड येथील एका निर्जनस्थळी नेले. तेथे दोघांनी मिळून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी कौशल्यपूर्वक या गुन्ह्याचा तपास केला तेव्हा. खून झालेली व्यक्ती संदीप शंकर शिंपी (रा. पॅन कार्ड कल्ब रोड, धनकुडे चाळ) असल्याचे समोर आले.

त्याचा खून केल्याप्रकरणी, पोलिसांनी मेव्हणा सतीश रामभाऊ गिर्हे आणि त्याचा साडू भाऊ दीपक विठ्ठल कोळेकर (रा. पॅन कार्ड क्लब रोड, चाकणकर मळा) या दोघांना अटक केली. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे ‘कानून के हात लंबे होते है…’ असे उगीच म्हटले जात नाही. मेहुण्याचा काटा काढण्याच्या नादात सतीशने बहिणीचा, आपला स्वत:चा आणि आपल्या साडूचा असे तीन संसार उद्ध्वस्त केले. याबाबतीत शांतचित्ताने मार्ग काढला असता, तर तीन-तीन संसारांची राखरांगोळी झाली नसती.

Back to top button