शिक्षण समाजाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारे असावे : डॉ. करमळकर | पुढारी

शिक्षण समाजाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारे असावे : डॉ. करमळकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हे भविष्याचा वेध घेणारे असावे, तसेच समाजाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारे असावे, असे मत सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई पुणे विद्यापीठ आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. करमळकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. राजीव हजरनीस, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, उपप्राचार्या डॉ. अपर्णा आगाशे आणि कार्यशाळेचे समन्वयक डॉ. नितीन आडे उपस्थित होते.

डॉ. करमळकर म्हणाले, यापुढील शिक्षण हे अधिक सूक्ष्म स्तरावर असणार असल्याचे सांगताना भविष्यात तंत्रज्ञानाच्या पलीकडील इतर शाखांनादेखील शिक्षणाच्या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगसारख्या विषयांचा शिक्षणात समावेश करावा लागेल, असे सांगितले. डॉ. पराग काळकर म्हणाले, आगामी काळात जग केवळ संगणक अभियंत्यांवर चालणार नसल्याने इतर अभ्यासक्रमांबाबतही पालकांना सजग करणे आवश्यक आहे. यापुढील काळात विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणासोबत प्रत्यक्ष कार्यानुभव देण्याची गरज आहे. तसेच, पीएचडी करताना तो विषय खरेच समजाचा प्रश्न सोडवणार आहे का, याचाही विचार व्हायला हवा, असेही डॉ. काळकर यांनी स्पष्ट केले. डॉ. विलास उगले यांनी या कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. मराठी विभागप्रमुख डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. नितीन आडे यांनी आभार मानले.

हेही वाचा

Back to top button