सोलापूर : संततधार, जनजीवन विस्कळीत | पुढारी

सोलापूर : संततधार, जनजीवन विस्कळीत

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पावसाची संततधार सुरू आहे. बळीराजा सुखावला असला तरी संततधारेने शहरी भागातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागांत पावसाचे पाणी साचले आहे. विद्यार्थ्यांचे, मंडईतील भाजी विक्रेत्यांचे हाल होत आहेत. रुग्णालयांत सर्दी-खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासून पावसाने अनियमितता दाखवली आहे. जिल्ह्यातील ग्रमीण भागापैकी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, माढा या भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या, मात्र मध्यंतरी पुन्हा पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या, तर पेरणी होऊन उगवण झालेली पिके धोक्यात आली होती. रविवारी व सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला होता. सोमवारी रात्री उशिरा संततधार सुरू झाली, ती मंगळवारी दिवसभर सुरू होती.

राज्यातील इतर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, सोलापूर जिल्ह्यात पाऊस दाखविण्यात आला नव्हता. सोमवारी मध्यरात्रीपासून सोलापूर शहरासह इतर भागातही पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी शहरात सूर्यदर्शन झाले नाही. ही संततधार शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, रस्त्यावरील तसेच भाजी मंडईतील विक्रेत्यांसाठी त्रासदायक ठरली. सकल भागासह अनेक ठिकाणी रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आरोग्यावरही परिणाम करू लागला आहे. परिणामी, शासकीय, खासगी रुग्णालयांत सर्दी-खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहेत. ग्रामीण भागात काहीअंशी या पावसाने दिलासा मिळाला असला तरी दमदार पावसाची गरज आहे. विहिरी, नदी, नाले, ओढे पूर्ण क्षमतेने वाहणारा पाऊस शेतीसाठीही उपयुक्त ठरणार आहे.

शहरातील 12 अतिधोकादायक इमारती पाडल्या

सोलापूर महानगरपालिकेने शहरातील धोकादायक, अतिधोकादायक अशा 112 इमारतींचा सर्व्हे केला. यामध्ये एकूण 110 धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात आल्या होत्या. दरम्यान,, आतापर्यंत शहरातील एकूण 12 अतिधोकादायक इमारती, काही भाग पाडकाम करण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाच्या वतीने देण्यात आली.

पावसाळ्यात धोकादायक इमारती पडण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने शहरातील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींसंदर्भात सर्व्हे करून 106 जणांना नोटिसा दिल्या होत्या. यापैकी 12 अतिधोकादायक इमारती तत्काळ निष्कासित करण्यात आल्या. महापालिकेच्या एक व खासगी 17 इमारतींचे पाडकाम व दुरुस्ती करण्यात आली. सद्यस्थितीत एकूण 88 धोकादायक इमारती आहेत. यापैकी 36 इमारतींचा मालक-भाडेकरू वाद आहे. 21 न्यायालयीन वाद असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत महापालिका प्रशासनाच्या वतीने 12 अतिधोकादायक इमारती पाडण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाच्या वतीने देण्यात आली.

चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची तारांबळ

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस मंगळवारी दिवसभर सुरू होता. त्यामुळे विविध कामांसाठी बाहेर पडलेल्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना भिजतच जाण्याची वेळ आली. अनेकांनी छत्री, रेनकोटचा आधार घेतला होता.

पाऊस दमदार नसलातरी दिलासा

गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. शेतीला म्हणावा तितकासा लाभ या पावसामुळे होणार नसला तरीही शेतकर्‍यांना दिलासा देणारा हा पाऊस ठरला आहे. त्यामुळे किमान जनावरांसाठी चारा तरी उपलब्ध होणार असल्याने बळीराजा समाधानी आहे.

Back to top button