तुळजाभवानी मातेच्या अभिषेक शुल्कवाढीला स्थगिती | पुढारी

तुळजाभवानी मातेच्या अभिषेक शुल्कवाढीला स्थगिती

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पुजार्‍यांच्या तीव्र विरोधानंतर मंदिर संस्थानने अभिषेक पूजेच्या शुल्कात केलेल्या दरवाढीला तसेच विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शनासाठी प्रतिव्यक्ती 200 रुपये शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही स्थगिती दिली आहे.

मंदिर संस्थान विश्वस्तांच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे राज्यासह, परराज्यातील भाविकांतून नाराजी व्यक्त झाली होती. भाविकांना मातेच्या पंचामृत अभिषेक पूजेसाठी मंदिर संस्थान केवळ 50 रुपये शुल्क आकारणी करीत होते. मात्र हाच कर दहापटीने वाढवून 500 रुपये करण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. या निर्णयाला स्थानिक पुजारी संघटनांकडून कडाडून विरोध झाला. त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. शुक्रवारी पुजार्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओबासे यांची भेट घेऊन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. त्याची दखल घेऊन अभिषेक पूजेची शुल्क वाढ व विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शन पाससाठी शुल्क आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली, अशी माहिती लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांनी दिली आहे.

Back to top button