मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराच्या घरातून ‘ईडी’कडून 30 कोटी जप्त | पुढारी

मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराच्या घरातून ‘ईडी’कडून 30 कोटी जप्त

रांची, वृत्तसंस्था : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) झारखंडमधील एका मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराच्या घरातून 30 कोटींहून अधिक रोकड जप्त केली. 12 तासांहून अधिक काळ रकमेची मोजणी सुरू आहे.

लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी (दि. 7) मतदान होत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच ‘ईडी’ने झारखंडमध्ये मनी लाँडरिंगप्रकरणी अनेक ठिकाणी छापे टाकून मोठी रोकड जप्त केली आहे. झारखंडमधील ग्रामीण विकास विभागातील अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ने मनी लाँडरिंगअंतर्गत छापे टाकून रोकड जप्त केली. आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचा नोकर जहाँगीर याच्या निवासस्थानी ही रक्कम आढळून आली आहे.

‘ईडी’ने रोख रकमेसह दागिनेही जप्त केले आहेत. मशिनच्या साहाय्याने जप्त केलेल्या नोटांची मोजदाद सुरू आहे. दूरचित्रवाहिन्यांवरून नोटांची मोजदाद सुरू असल्याचे वृत्त प्रसारित?झाले आहे. यावर आलम यांनी आपणास या घटनेबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी कारवाई झाली आणि ज्या ठिकाणी रोकड मोजली जात आहे, ते ठिकाण आपल्या सचिवाच्या नोकराचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्य अभियंता वीरेंद्र राम हे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. 100 कोटींच्या घोटाळाप्रकरणी गेल्यावर्षी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पेनड्राईव्हमधून त्यांनी राजकीय नेत्यांसोबत व्यवहार केल्याचे निदर्शनास आले होते. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. राम यांच्याशी संबंधित ठिकाणीही छापे टाकण्यात आले. याशिवाय ‘ईडी’ने राजकीय नेत्यांच्या निवासासह कार्यालयावरही छापे टाकले.

Back to top button