पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (दि.७) १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. रांगेत उभे राहून पंतप्रधान मोदी यांनी मतदान केले.
तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यातील उमेदवारांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (गुणा, मध्य प्रदेश), मनसुख मांडविया (पोरबंदर, गुजरात) आणि प्रल्हाद जोशी (धारवाड, कर्नाटक) यांचा समावेश आहे.
या टप्प्यातील सुरत येथे काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाला आणि नंतर ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे अनंतनाग-राजौरी मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या मतदारसंघात सहाव्या टप्प्यात २५ में रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात असलेल्या बैतुल (मध्य प्रदेश) मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराच्या निधनामुळे हे मतदान तिसऱ्या टप्प्यात म्हणजे आज होत आहे. ७ केंद्रीय मंत्री आणि ५ माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.