दलित, मागास, आदिवासींच्या आरक्षणाचा कोटा वाढविणार : राहुल गांधी | पुढारी

दलित, मागास, आदिवासींच्या आरक्षणाचा कोटा वाढविणार : राहुल गांधी

भोपाळ, वृत्तसंस्था : काँग्रेस सत्तेत आल्यावर दलित, मागास आणि अनुसूचित जमातींना आरक्षण वाढवून देणार असल्याची ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली.

येथील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर 50 टक्क्यांपर्यंची मर्यादा घातली आहे. केंद्रात आमचे सरकार सत्तेत आल्यावर ही मर्यादा हटवून दलित, मागास आणि आदिवासींना आरक्षणाचा कोटा वाढवून देण्यात येईल. काँग्रेससह इंडिया आघाडीचा लढा हा संविधानाच्या बचावासाठी आहे, तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राज्यघटना संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. जमीन, जंगल आणि पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. राज्यघटनेमुळेच नैसर्गिक संसाधनांवर देशवासीयांना अधिकार प्राप्त झाला आहे. संघाच्या वतीने मात्र यावर घाला घातला जात आहे. नैसर्गिक संसाधनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण अधिकार हवा आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर राज्यघटना बदलली जाणार आहे.

भाजपच्या नेत्यांनीच राज्यघटना बदलणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे. मात्र, जनता त्यांना 150 जागा देईल की नाही, याची खात्री नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, युवकांसाठी वर्षाला दोन कोटी रोजगारांची निर्मिती करणार असल्याची वल्गना मोदी करीत आहेत. मोदी हे खोटे बोलत असल्यामुळेच बेरोजगारी वाढली आहे. त्यांना केवळ त्यांच्या 22 अब्जाधीश उद्योगपती मित्रांच्या हिताचीच काळजी आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मनरेगांतर्गत मजुरी 250 वरून 400 रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Back to top button