सोलापूर : संत निवृत्ती महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत | पुढारी

सोलापूर : संत निवृत्ती महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : ‘माऊली… माऊली…’च्या जयघोषात व भंडार्‍याची उधळण करत संत निवृत्ती महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील व करमाळा तालुक्यातील रावगाव येथे स्वागत करण्यात आले. या पालखीचा शुक्रवारी कंदर येथे मुक्काम असणार आहे. जेसीबी आणि जिल्हा हद्दच्या कमानीवरून या पालखीवर भंडारा, गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी वारकर्‍यांना रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.

सोलापूर व नगर जिल्ह्याच्या हद्दीवर जिल्हा प्रशासनाने पालखीचे पादुका पूजन करून स्वागत केले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांचे कार्याधिकारी यशवंत माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळके, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, विनायक माहुरकर, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, जेलर समीर पटेल, संतोष गोसावी, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मंगलसिंग घुशिंगे, मंडल अधिकारी युसूफ बागवान, सादिक काझी या प्रशासकीय अधिकारी यांनी शासनातर्फे स्वागत केले. रावगाव सरपंच दादासाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी रावगाव वेशीत पालखीचा प्रवेश होताच सर्वांचे स्वागत केले. यावेळी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर, भाऊसाहेब महाराज गंभीरे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमानंतर रावगावमध्ये पालखी सोहळा पालखी स्थळावर मुक्कामी होता. पालखी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष नीलेश गाडवे-पाटील यांनी यंदाच्या प्रशासनाच्या सोयीसुविधांबाबत समाधान व्यक्त केले. भाविकांसाठी प्रा. रामदास झोळ फाऊंडेशन, रावगाव ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्याकडून पिण्यासाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली होती.

Back to top button