सोलापूर: माढ्यात दुपारी तीन पर्यंत ३७.०५ टक्के मतदान; कुर्डू येथे मतदानावर बहिष्कार  | पुढारी

सोलापूर: माढ्यात दुपारी तीन पर्यंत ३७.०५ टक्के मतदान; कुर्डू येथे मतदानावर बहिष्कार 

माढा: पुढारी वृत्तसेवा: माढा विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये दुपारी तीन पर्यंत ३७.०५ टक्के इतकेच मतदान झाले होते. मतदारांमध्ये मतदानाबद्दल सुरुवातीच्या काळात निरुत्साह जाणवला. माढा तालुक्यातील करमाळा विधानसभेत येणाऱ्या व  साडेआठ हजार मतदारसंख्या असलेल्या कुर्डू गावाने मतदानावर सिंचनाच्या प्रश्नासाठी बहिष्कार टाकला. तालुक्याच्या पूर्व भागात सिनाकाठी निरुत्साह जाणवत होता.

माढा तालुक्यात निमगाव  येथे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे, दूधसंघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सपत्नीक मतदान केले. वाकाव येथे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी तर माढा येथे माजी आ धनाजीराव साठे, नगराध्यक्ष मिनलताई साठे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

माढा मतदारसंघात माढा तालुक्यातील ७८, पंढरपूर तालुक्यातील ४२, माळशिरस तालुक्यातील १४ गावांचा समावेश होतो. या मतदारसंघात सकाळी नऊ पर्यंत ३.५७ अकराला १२.९०, दुपारी एक पर्यंत २०.२९ तर तीन वाजेपर्यंत ३७.०५ टक्के इतके मतदान झाले होते. माढा विधानसभेत ३लाख ३७ हजार ६३२ इतक्या मतदारांपैकी १ लाख २५ हजार ८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  यात ५१ हजार ९६५ स्त्री मतदारांनी मतदान केले होते.

मतदारसंघात दोन ठिकाणी मशीन बिघाडाच्या तक्रारी होत्या. त्यापैकी श्रीपूर- महाळूंग (ता. माळशिरस) येथील बुथ क्रमांक ३०७ वरील पूर्ण युनिट बदलण्यात आले. तर नगोर्ली (ता. माढा) येथील बुथ क्रमांक २६ येथे व्हीव्ही पॅट बदलण्यात आले. माॅकपोल घेताना १६ ठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्याने त्याही मशीन बदलण्यात आल्या.

माढा तालुक्यातील कुर्डू या गावाने बेंद ओढ्यात सीना माढा सिंचन योजनेतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. याच मागणीसाठी नागपूर अधिवेशनात या परिसरातील गावांनी उपोषण केले होते. त्यांना त्यावेळी आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतरही गावकऱ्यांचे समाधान न झाल्याने बहिष्कार टाकण्यात आला. याठिकाणी तेवीस जणांनी मतदान केले होते. मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने याचा फटका कोणाला बसू शकतो. याचा अंदाज प्रमुख नेतेमंडळी घेत आहेत.

हेही वाचा 

Back to top button