पश्चिम महाराष्ट्रात शेती क्षेत्रात वेगाने घट | पुढारी

पश्चिम महाराष्ट्रात शेती क्षेत्रात वेगाने घट

सोलापूर; महेश पांढरे :  विविध कारणांनी शेतकर्‍यांकडे उपलब्ध असलेल्या शेती क्षेत्रात झपाट्याने घट होत चालली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत अल्पभूधारकांची संख्या वाढत चालली आहे, तर काही ठिकाणी भूमिहीन होण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम म्हणून बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या काही वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेती क्षेत्रामध्ये झपाट्याने घट झालेली आहे. त्यामुळे कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 23 लाख 30 हजार 415 शेतकर्‍यांकडे आता एक हेक्टरपेक्षा कमी जमीन उरली आहे.
भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आपल्या देशात सर्वाधिक लोक हे शेती आणि शेतीपूरक व्यवसायाशी जोडलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन शेतीच आहे. अनादी कालापासून देशात शेती हा प्रमुख व्यवसाय केला जातो. त्यामुळे देशातील आणि राज्यातील 70 टक्के लोक हे शेती व्यवसायाशी जोडलेले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वाढते औद्योगिकीकरण, नवे उद्योग, नवे प्रकल्प, रस्ते, धरणे, नवे रेल्वे प्रकल्प तसेच मानवी वसाहतीसाठी बिगरशेतीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. त्यामुळे शेती क्षेत्राचा वापर या प्रकल्पांसाठी होत असल्याने उपलब्ध शेती क्षेत्रामध्ये झपाट्याने घट होत चालली आहे.
सध्या विभक्त कुटुंब पध्दती वाढत चालली आहे. त्यामुळे वडिलोपार्जित असलेल्या जमिनीमध्ये हिस्से पडल्याने शेत जमिनीचे वाटप झाल्यानेही शेती विभागली गेली आहे. त्यामुळे भाव-भावकीत वाटप झाल्यानंतर शेती क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे वाटून आलेल्या एकर-दोन एकर जमिनीवर आपला उदरनिर्वाह होत नसल्याने अनेक कुटुंबांनी गावाकडील पारंपरिक शेती व्यवसाय सोडून उद्योग व्यवसाय आणि नोकरीसाठी मोठ-मोठी शहरे गाठली आहेत. त्यामुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे, तर त्या प्रमाणात गावे ओस पडली आहेत.
गावातील 10 टक्के लोकांकडेच आता पुरेसे शेती क्षेत्र उरले आहे. त्यामुळे अल्पभूधारकांची संख्या वाढली आहे. अनेकांनी आता शेती हा व्यवसाय सोडून शहरात नोकरी आणि उद्योग शोधला आहे.   भाव-भावकीत वाटणी होऊन अनेक हिस्से पडत गेल्याने अनेकांच्या वाटणीला गुंठ्यावर जमीन आली आहे. अशा परिस्थितीत अनेकांनी थेट शेती वाटून आलेली 20 ते 30 गुंठे जमीन विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षार्ंत लाखो शेतकरी भूमिहीन झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भूमिहीन शेतकर्‍यांची संख्या वाढू लागल्याने शेतीबाबत अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.

शेती क्षेत्रावर नवे प्रकल्प आणि रस्त्यामुळे आले गंडांतर

राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने अनेक नवे प्रकल्प उभे केले जातात. अशा प्रकल्पांसाठी हजारो एकर जमिनीची गरज असते. त्यामुळेही शेती क्षेत्रावर गंडांतर आले आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांत राज्यात आणि देशात विविध राष्ट्रीय महामार्गांसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. त्यामुळेही अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. तसेच यापूर्वी बांधण्यात आलेली धरणे आणि काही उर्जा प्रकल्पांमुळेही शेती क्षेत्रात कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.

भावकीतील विभागणी आणि बिगरशेतीचे प्रमाण वाढले

पूर्वीच्या धारण केलेल्या जमिनीत भाव-भावकीत जमिनीचे वाटप होत चालले आहे. त्यामुळे जमिनीचे तुकडे पडत चालले आहेत, तर दुसरीकडे शहरीकरण वाढत चालले आहे. त्यामुळे उपलब्ध शेतीवर बिगरशेती करुन प्लॉटिंग करून विकण्याचा नवा उद्योग शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. त्यामुळेही शेतीचे प्रमाण घटत चालले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता भूमिहिनांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button