मंगळवेढा : ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया | पुढारी

मंगळवेढा : ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया

मंगळवेढा; पुढारी वृत्तसेवा : उजनी धरणातून मंगळवेढ्यासाठी कॅनॉलव्दारे पाणी सोडण्यात आले. मात्र भीमा पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वितरिका क्रमांक 5 मधून काळ्या शिवारात गेल्याने ते पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याकामी लक्ष घालून बेफिकीर कामकाज करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

उजनी धरणातून एप्रिल महिन्यात मंगळवेढ्यासाठी कॅनॉलव्दारे पाणी सोडले होते. वितरिका क्रमांक 5 मंगळवेढा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गामधून गेल्याने येथील कामकाज व्यवस्थित न झाल्यामुळे पाणी रोडच्या पलीकडे न जाता अलीकडच्या बाजूला कॅनॉल फुटून हजारो लिटर पाणी काळ्या शिवारात सर्वत्र पसरल्याचे चित्र आहे. याबाबत प्रसारमाध्यमांतून वृत्त प्रसिध्द होऊनही भीमा पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांना कॅनॉल दुरुस्ती करुन घेण्याचे न सुचल्यामुळे मागील दोन दिवसांपूर्वी कॅनॉलव्दारे सोडण्यात आलेले पाणी कॅनॉलचे काम दुरुस्त न केल्यामुळे पुन्हा काळ्या शिवारात हायवेलगत पसरल्याचे चित्र आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सोलापूर शहरालाही आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने पाणीटंचाईची भीषणता असतानाही येथील पाटबंधारे विभागाच्या निष्क्रिय अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्याने येथील कामकाजावर नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

सद्यःस्थितीला उजनी मायनसमध्ये असून भविष्यात पावसावर उजनीची भिस्त अवलंबून आहे. भीमा नदी कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावावर पाण्याची टांगती तलवार झाली असताना येथील अधिकार्‍यांच्या बेफिकीर वागणुकीचा फटका बसत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याकामी लक्ष घालून अशा कामचुकार अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी काळ्या शिवारातील वाया जाणारे पाणी पाहून नागरिक करीत आहेत.

Back to top button