सांगोला : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; एक ठार | पुढारी

सांगोला : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; एक ठार

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या चारचाकीची आणि मोटरसायकलची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अशोक नाना वाघमारे (वय ५० वर्षे रा माडगुळे ता. आटपाटी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नानासो बिरा आमुने (वय ४० वर्षे रा एखतपुर ता सांगोला) हा तरुण गंभीर जखमी झाला असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आमदार पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही दुखापत झालेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाझरा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरासाठी सांगोला आमदार शहाजीबापू पाटील गेले होते. शिबिराचा कार्यक्रम आटोपून ते सांगोला शहराकडे परत येत होते. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलिसांची संरक्षक गाडी होती. नाझरा ते नाझरामठ या रस्त्यावर बोराटेवाडी येथे गुरुवारी (दि. ९ फेब्रुवारी) साडेचारच्या सुमारास मयत अशोक वाघमारे व नानासो आमुने हे मोटरसायकलवरून (क्र. एमएच ४५ ए जे ६३३०) माडगुळेकडे निघाले असताना ताफ्यातील चारचाकीला (क्र. एमएच १३, डी एम ९४४०) मोटर सायकल धडकल्याने अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीने पोलिसांच्या गाडीला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वारापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचे देखील या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. मात्र अद्याप या अपघाताचा सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

हेही वाचा

Back to top button