धक्कादायक! राजगुरुनगरमध्ये शालेय पोषण आहारातून ६१ विद्यार्थ्यांना विषबाधा, मळमळ पोटदुखीने अस्वस्थ विद्यार्थी | पुढारी

धक्कादायक! राजगुरुनगरमध्ये शालेय पोषण आहारातून ६१ विद्यार्थ्यांना विषबाधा, मळमळ पोटदुखीने अस्वस्थ विद्यार्थी

राजगुरूनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: शहरातील हुतात्मा राजगुरू विद्यालयाच्या ६१ विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि ९) शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. दुपारच्या सुट्टीत घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली.

शाळेतील काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि पोटदुखी सुरू झाल्यावर मुख्याध्यापक अशोक नगरकर यांनी जवळच असलेल्या चांडोली ग्रामीण रुग्णालयात मुलांना दाखल केले. याची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी शाळेत व रुग्णालयात गर्दी केली. प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, गटशिक्षण अधिकारी जीवन कोकणे आदींनी विद्यार्थ्यांना उपचारासाठी तातडीचे प्रयत्न केले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गरड व पथकाच्या निगराणी खाली विद्यार्थ्यांना २४ तास रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

हुतात्मा राजगुरू विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीत शिकणारे २९६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ६१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या प्रकाराने पालकांमध्ये भीतीचे वातावरणात पसरले आहे. दुपारी एक वाजता जेवणाची सुट्टी झाली. नेहमीप्रमाणे पोषण आहारातील भात विद्यार्थ्यांनी खाल्ला. खाताना अनेक विद्यार्थ्यांना भातात साबणाचा वास येत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जेवण कमी केले. दीड वाजता शाळा सुरू झाली. पावणेदोन वाजता वर्गात बसलेल्या अनेक मुलांना मळमळ होऊन पोट दुखु लागले. त्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांडोली रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तोबा गर्दी झाली होती. पोषण आहार बनविणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी यावेळी केली.

Back to top button