काँग्रेसमुक्त भारत भाजपचे नव्हे तर जनतेचे अभियान : अजयकुमार मिश्रा | पुढारी

काँग्रेसमुक्त भारत भाजपचे नव्हे तर जनतेचे अभियान : अजयकुमार मिश्रा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशात अजिबात प्रतिसाद नाही असा दावा करताना काँग्रेसमुक्त भारत हे भाजपचे नव्हे तर जनतेचे अभियान आहे. तेव्हा जनता स्वत:हून काँग्रेसला दूर सारत आहे, या शब्दांत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी गुरूवारी सोलापुरातील पत्रकार परिषदेत काँग्रेसवर निशाणा साधला. याचवेळी त्यांनी आगामी काळात देशात समान नागरी कायदा येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे गुरूवारी सोलापुरात आले होते. राहुल गांधींच्या भारत जोडो अभियानाबाबत बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांना राजकारणात प्रस्थापित व्हायचे आहे, पण तसे होत नसल्याने त्यांना प्रस्थापित करण्याचा वारंवार प्रयत्न काँग्रेसकडून होत आहेत. प्रस्थापित होण्याबाबत राहुल गांधी साफ अपयशी ठरले आहेत. काँग्रेसकडे कुठलाही अजेंडा नाही. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्याकडे केवळ जुन्या विषयांवर भाष्य करणे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे याशिवाय दुसरे काहीच नाही, असा टोला अजयकुमार मिश्रा यांनी लगाविला.

सीमावादावर तोडगा काढणार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा खूप जुना विषय आहे. यावर केंद्र सरकारने तोडगा काढण्याच्या दृष्टीने पहिली बैठक घेतली आहे. यावर निर्णय व्हायला वेळ लागेल, पण तोडगा निश्‍चित निघणार, अशी ग्वाही यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल सांगितले.

सम्मेद शिखरजीचाही प्रश्‍न सोडविणार

झारखंडमधील जैनांचे तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीसंदर्भातील वाद सोडविण्याबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे. वास्तविक हा झारखंड सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. जैन समाजाचे राष्ट्र निर्माणात मोठे योगदान आहे. अतिशय संवदनशील असलेल्या विषयावर केंद्र सरकार राज्य सरकारसमवेत चर्चा करून प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही अजयकुमार मिश्रा यावेळी सांगितले.

महागाई उलट कमी होतेय

देशातील वाढत्या महागाईच्या मुद्याकडे लक्ष वेधले असता अजयकुमार मिश्रा म्हणाले की, महागाईचा निर्देशांक सहा टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, पण सध्याचे निर्देशांक ५.८ इतके आहे. याचाच अर्थ देशातील महागाई कमी होत आहे.

खर्‍या इतिहासाचे पुनर्लेखन

३७० कलम हटविण्याचे महत्वपूर्ण काम मोदी सरकारकडून झाले आहे. भव्य राम मंदिर निर्माण करण्याबरोबर आता भावी काळात देशात समान नागरी कायदादेखील लागू होणार आहे. भारताच्या प्रतिष्ठेची पुनर्स्थापना करण्यासोबत पुरावे, तथ्यावर आधारित खर्‍या इतिहासाच्या पुनर्लेखनाची महत्वपूर्ण काम केंद्र सरकार करणार आहे, असेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेला खा. डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, भाजप प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब भेगडे, जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राणा जगजितसिंह, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, रुद्रेश बोरामणी आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button