

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : उत्तर भारतातील थंडीचा कडाका वाढला असून हवामान खात्याने येत्या 7 तारखेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात पुढील काही दिवस दाट धुके राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या थंडीच्या मोसमातील सर्वात कमी म्हणजे 2.8 अंश सेल्सियस इतके तापमान गुरुवारी सकाळी राजधानीत नोंदविले गेले.(Delhi Temperature)
उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थानमधील तापमान झपाट्याने कमी झाले आहे. दिल्लीतील लोधी रोड हवामान केंद्रावर 2.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. तर सफदरजंग हवामान केंद्रावर 3 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले. मध्य आणि पूर्व भारतात पुढील दोन ते तीन दिवस दाट धुके राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान धुक्याचा परिणाम रेल्वे, हवाई वाहतूक तसेच रस्ते वाहतुकीवर झाला आहे. दिल्लीतील पालम येथे दृष्यता अवघी 25 मीटर तर सफदरजंग येथे 50 मीटर इतकी नोंदविण्यात आली.
थंडीचा कडाका लक्षात घेऊन दिल्ली विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी दक्षतेचा इशारा दिला आहे. मागील दोन ते तीन दिवसांत धुक्यामुळे शंभरच्या आसपास विमानांचे आगमन आणि प्रस्थान लांबल्याचेही विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. बुधवारी दिल्लीतील किमान तापमान 4.4 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 16.5 अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले होते. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये कमाल 12.9, गुरुग्राममध्ये 15 तर फरिदाबादमध्ये 17.3 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.
हेही वाचा