लोणावळा : हॉटेलमधील जलतरण तलाव ? छे ! मृत्यूचा सापळाच… | पुढारी

लोणावळा : हॉटेलमधील जलतरण तलाव ? छे ! मृत्यूचा सापळाच...

विशाल पाडाळे :

लोणावळा : लोणावळा शहरात मागील काही कालावधीत स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत लोणावळा परिसरातील जलतरण तलावात बुडून चार जणांचा मृत्यू झाला. यात दोन बालकांचा, एक तेरा वर्षीय मुलाचा, तर एका 22 वर्षीय युवकाचा समावेश आहे. या घटनांमुळे लोणावळा परिसरातील जलतरण तलावांच्या सुरक्षिततेचा तसेच हे जलतरण तलाव अधिकृत की अनधिकृत? हेही चर्चा जोर धरू लागली आहे; तसेच या जलतरण तलावातील दुर्घटनांना अखेर जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पर्यटन स्थळ तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात पर्यटकांना खासगी बंगले भाड्याने देण्याचा एक ट्रेंड सध्या सुरू आहे. येथे येणारे बहुतेक पर्यटक हे हॉटेलपेक्षा अशा खासगी बंगल्यांना जास्त पसंती देतात; मात्र त्यातही ज्या बंगल्यात जलतरण तलाव आहे, असे बंगले प्राधान्यक्रमाने आणि जास्त पैसे देऊन बूक केले जातात. त्यामुळे बंगले भाड्याने देणार्‍या बंगलेधारकांकडून आपल्या बंगल्याच्या किंवा रो हाऊसच्या आवारात ज्या ठिकाणी मोकळी जागा मिळेल तेथे अक्षरशः हवा तसा खड्डा खणून जलतरण तलाव तयार केला जातो. हे तयार करीत असताना कोणत्याही सुरक्षा मानकांचे पालन केले जात नाही.
आतापर्यंतच्या चारही घटनांपैकी जुलै महिन्यात पहिल्या दोन घटना घडल्यानंतर लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी नगर परिषद अधिकार्‍यांची बैठक घेतली होती.

या बैठकीत नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून दोन दिवसांत शहरातील प्रत्येक भागातील बंगल्यात तसेच रो हाऊसमध्ये बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचा सर्व्हे करून ते अधिकृत आहे की अनधिकृत आहे, याचा अहवाल सादर करण्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला होता. त्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये शहरात एकूण 997 जलतरण तलाव असल्याचे समोर आले. मात्र, त्यानंतर त्या सर्व्हेचे पुढे काय झाले, किती जलतरण तलावांवर कारवाई झाली, किती जलतरण तलाव अधिकृत करण्यासाठी अर्ज आले, याचा काहीही लेखाजोखा अद्यापी पुढे आलेला नाही.

बांधकाम नियमावलीत तलाव मान्यतेसंदर्भात स्पष्टता नाही

लोणावळा नगर परिषदेच्या बांधकाम नियमावलीमध्ये जलतरण तलाव मान्यतेसंदर्भात कोणतीही स्पष्टता नसल्याने तलाव अधिकृत की अनधिकृत हे ठरविण्यास उशीर होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, लोणावळा नगर परिषदेमध्ये होत असलेल्या विकासकामांवर लक्ष तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्च न्यायालयीन समितीने नियमाधीन अटींची पूर्तता करून घेऊन स्वीमिंग पूलला अधिकृत मंजुरी देण्यासंदर्भात काही सूचना केल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे.

लोणावळा शहरातील स्वीमिंग पूल अधिकृत करण्यासाठी सर्वप्रथम मुख्याधिकारी पंडित पाटील आणि उच्च न्यायालयीन समिती यांनी सांगितल्याप्रमाणे नियमाधीन अटी नक्की कोणत्या असाव्यात, याची स्पष्टता लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे जलतरण तलावाच्या वापराबाबत जे प्राथमिक नियम सर्वत्र पाळले जातात तेच थोड्याफार बदलाने याठिकाणी नियमांच्या रूपात पुढे

येण्याची शक्यता आहे. साधारणपणे हे नियम पुढीलप्रमाणे असू शकतील :

जलतरण तलावाची खोली 4 फूट 6 इंच यापेक्षा जास्त नसावी. खोली जास्त असल्यास त्याठिकाणी सदैव प्रशिक्षित जीवरक्षक तैनात असावा.
जलतरण तलावाच्या भोवताली सुरक्षा चैन अथवा जाळी असावी.
जलतरण तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण केले गेलेलं असावं.
ठरावीक काळानंतर तलावातील पाणी बदलण्यात यावं.
जलतरण तलावाच्या ठिकाणी जलतरण तलाव सुरू होण्याची आणि बंद करण्याची वेळ नमूद करण्यात आलेली असावी.
जीवरक्षक तैनात नसल्यास तशी सूचना त्याठिकाणी स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावण्यात आलेली असावी.
याशिवाय वरील नियमांच्या व्यतिरिक्त जलतरण तलावातील बदलल्या जाणार्‍या पाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते, तलावातील फरशा आणि आसपासच्या परिसराची दुरुस्ती- डागडूजी केली जाते का, यासारख्या अनेक गोष्टींचा आढावा घेणे, जलतरण तलावाची नित्याने तपासणी गरजेची आहे. या सर्व पूर्ततांशिवाय बांधकाम नियमांची पूर्तता झाल्यावर जलतरण तलाव अधिकृत करता येऊ शकेल. मात्र, हे लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. अन्यथा वरीलप्रमाणे दुर्घटना घडत राहिल्यास त्याची जबाबदारी नक्की कोणाची राहणार, हा प्रश्नदेखील अनुत्तरीत राहील.

आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच शिवबा पवार नावाच्या एका दोन वर्षीय चिमुरड्याचा जलतरण तलवामध्ये बुडून मृत्यू.

अपुर्‍या सुरक्षेअभावी स्वीमिंगपूलमध्ये खेळल्यानंतर ओल्या अंगाने तेथील विजेच्या खांबाला हात लागल्यामुळे हरुन मसूद वाली या 13 वर्षाच्या बालकाचा शॉक लागून मृत्यू झाला.

सकाळी घरातील सगळे लोक नाश्ता करीत असताना हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद ही दोन वर्षांची मुलगी जलतरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाला.

आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या निखिल संपत निकम या 22 वर्षीय युवकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला.

 

Back to top button