साकोरीत कुकडी कालवा फुटला; हजारो लिटर पाणी गेले वाया | पुढारी

साकोरीत कुकडी कालवा फुटला; हजारो लिटर पाणी गेले वाया

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : साकोरी शिवारात कुकडी डावा कालवा फुटल्यामुळे रस्त्यावर तसेच शेतातील पिकांत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले. कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदे, कर्जत व पारनेर तालुक्याला पिण्यासाठी पाणी कुकडी डाव्या कालव्यातून सोडले आहे. कर्जतमधील तलावात अगोदर हे पाणी सोडणार होते. मात्र, ते कर्जतपर्यंत पोहोचण्यापूर्वीच जुन्नर तालुक्यातील बेल्हेनजीक असलेल्या साकोरी गावच्या हद्दीत कुकडी कालवा अचानक फुटला. त्यामुळे कालव्यातील पाणी वाट मिळेल तिकडे धावत होते. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी दिसत होते.

कालवा फुटल्याचे समजताच कुकडी पाटबंधारे विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी धावले. नंतर धरणातून पाणी कमी करण्यात आले. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न होईपर्यंत परिसरात सर्वच शेतपिकात पाणीच पाणी झाले. कालव्याच्याजवळ तर एका तळ्याइतका पाण्याचा अपव्यय झाला होता. फुटलेला भराव बुजवण्याचे काम आणि शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाई देण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.

Back to top button