मंगळवेढा कारागृहात कैद्याची आत्महत्या | पुढारी

मंगळवेढा कारागृहात कैद्याची आत्महत्या

मंगळवेढा : पुढारी वृतसेवा :  मंगळवेढा सबजेलमध्ये पोस्को गुन्हात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सुनील तानाजी किसवे (वय 21, रा. शिरनांदगी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. 16) रोजी पहाटे 1.30 वाजण्यापूर्वी खिडकीला मफलरच्या साह्याने गळफास घेतला. या घटनेची मंगळवेढा पोलिसांत अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
दरम्यान, गार्डवरील पोलिस बसण्याच्या ठिकाणापासून केवळ  चार फूट अंतरावर आरोपीने गळफास झाल्याने ही घटना संशयास्पदाच्या भोवर्‍यात आडकली आहे.

सुनील किसवे याने एका 14 वर्षीय मुलगी शाळेत जाताना तिचा पाठलाग करून ‘तू माझ्याशी लग्न कर, तू माझी झाली नाहीस तर दुसर्‍याची कोणाची होणार नाही‘ असे म्हणून तिला जीव मारण्याची धमकी दिली. तसेच तिला केळीच्या बागेत नेऊन लज्जास्पद वर्तन करून फोटो काढून नातेवाईकांच्या वॉटस् अपवर पाठवण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात आरोपीला अटक करून तपासाधिकारी पोलीस निरीक्षक माने यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पंढरपूर येथील न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला होता. त्यामुळे तो नाराज स्थितीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गेल्या दोन दिवसापूर्वी त्याचे वडील त्याला भेटून गेले होते. दरम्यान, काल रात्री दीडच्या सुमारास त्याने गळ्यातील मफलरच्या साहाय्याने खिडकीच्या गजाला गळफास घेतला. आज सकाळी कैद्यांची हजेरी घेताना एकजण गैरहजर असल्याचे सुरक्षारक्षकांना आढळून आले. त्यांनी हजेरीबुक तपासता सुनील हा गैरहजर होता. त्याच्या बराकजवळ जावून पाहता त्याने खिडकीला गळफास घेतल्याचे आढळून आले. पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आला.

दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक जाधव, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी रात्री उशिरा कारागराला भेट दिली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळावेढा पोलीस स्टेशनला आज भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

Back to top button