सोलापूर : ‘काट्याकुट्यातून तुडवत चिखल…स्कूल चले हम!’ | पुढारी

सोलापूर : ‘काट्याकुट्यातून तुडवत चिखल...स्कूल चले हम!’

भोसे (क.) ; सचिन पवार :   जेमतेम 10 फुटांचा रस्ता… रस्त्यावर गुडघ्याएवढे खड्डे… खड्ड्यात पाणी… रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे… सर्वत्र चिखल… अशा बिकट परिस्थिती मध्ये शेवते (ता. पंढरपूर) येथील उलभगत मळा परिसरातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांना दररोज ये- जा करावी लागत आहे.

मागील 5 दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात 24 तास संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून वाहतूक धोकादायक बनली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. संततधार पावसामुळे रस्ते निसरडे बनले असून प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

.शेवते येथेही उलभगत मळा ते पीरवाडी (आव्हे रोड) रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. 1 किमी लांबीच्या या रस्त्याच्या 800 मीटर खडीकरण झालेले आहे. मात्र केवळ 200 मीटर अंतराचा रस्ता खडीकरण न केल्यामुळे सध्याच्या संततधार पावसामुळे निसरडा बनला आहे. खडीकरण न झालेल्या रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. येथील रहिवाशांची याच रस्त्यावरून सर्व वाहतूक होत असल्यामुळे रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचून राहत आहे. वाहन चालकांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने लहान मोठे अपघात होत आहेत. याच रस्त्यालगत सुमारे 50 ग्रामस्थ राहत आहेत. या भागातील लहान मुलांना शाळेसाठी याच रस्त्यावरून जीव धोक्यात घालून काट्यातून चिखल तुडवत शाळेला जावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी या रस्त्याचे खडीकरणाचे अर्धवट राहिलेले काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी या भागातील विद्यार्थी, ग्रामस्थांनी केली आहे.

…अन् चिखल पाहून शववाहिका थांबली
शेवते येथील उलभगत मळा येथे राहणारे अरुण जिरेकर यांचे मंगळवारी (12) सायंकाळी दवाखान्यात उपचार घेत असताना निधन झाले. त्यांचे शव रात्री 8 वाजता त्यांच्या शेतातील घरी आणण्यात आले. मात्र संततधार पाऊस सुरू असताना गुडघ्याएवढा चिखल असलेल्या या रस्त्यावरून शववाहिका आतमध्ये नेता आली नाही. परिणामी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करत लहान ट्रॅक्टरमधून शव न्यावे लागले.

Back to top button