तुळजापूर : नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी होणार का? | पुढारी

तुळजापूर : नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी होणार का?

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा :  तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी होणार का? 10 वर्षांपासून सत्तेवर असणारे नगरपालिका निवडणुकीचे सूत्रधार विनोद गंगणे यांच्या वर्चस्वाला कोण हादरा देणार? का पुन्हा गंगणे यांची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर नगरपरिषद मागील 10 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर सत्तेवर आलेली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर येथील नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बरांनी आमदार पाटील यांना आपला पाठिंबा दिला आहे. मागील दोन वर्षांपासून नगरपरिषद निवडणुकीच्या होणार्‍या लढतीच्या निमित्ताने जनतेमध्ये उत्सुकता आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने खर्चिक असणार्‍या या निवडणुका अनेक उमेदवारांना डोकेदुखी बनल्या आहेत. निवडणुकीमध्ये होणारा खर्च लक्षात घेता सामोपचाराने महाविकास आघाडी करून एकास एक उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडी उत्सुक असल्याचे समजते. या अनुषंगाने काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते गोकुळ शिंदे यांच्यादरम्यान प्रारंभिक चर्चा झाल्याचे समजते. शिवसेना पक्षदेखील महाविकास आघाडी करण्यासाठी उत्सुक आहे. महाविकास आघाडी तुळजापूर येथील राजकीय परिस्थिती लक्षात घेता फायद्याचे राजकारण ठरू शकते. त्याचबरोबर प्रत्येक पक्षातील चांगल्या उमेदवारांना इतर पक्षांची ताकद मिळू शकते. नगरपरिषदेच्या विरोधात असणारी सहानुभूती मिळवण्यासाठी महाविकास आघाडी झाली तर अधिक फायदा होईल, असा इच्छुक उमेदवारांचा आणि जाणकारांचा कयास आहे

सत्ताधारी नगरपरिषदेच्या नगरसेवकांच्या राजकीय रणनीतीच्या अनुषंगाने नगरपालिका निवडणुकीचे सूत्रधार विनोद गंगणे यांनी अनेक दिवसांपासून आपली स्वतःची तयारी ठेवलेली आहे. पूर्वीपासून आपल्या पसंतीचे उमेदवार देऊन बहुमत ठेवण्याचे कौशल्य त्यांना सापडलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी आणि आघाडीला मिळणारे पाठबळ यांचा प्रामाणिकपणा सत्ताधारी गंगणे गटासाठी महत्त्वाचा आहे. गंगणे यांनी भाजपचे कमळ स्वीकारले असल्यामुळे जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते यांचा मेळ कसा बसणार, हेदेखील या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

तुळजापूर येथील राजकारण नातीगोती आणि जातीवर अवलंबून असल्यामुळे यावर्षी होणार्‍या या निवडणुकीच्या काळात कोणकोणते नवीन राजकीय फंडे वापरले जातात, हेदेखील पाहावे लागणार आहे. आश्‍वासनांचा पाऊस पाडला जात आहे. अनेकांना स्वीकारत आणि इतर संधी देण्याच्या अनुषंगाने आपल्याजवळ आणले जात आहे. या सर्व राजकारणामध्ये महाविकास आघाडी किती ताकदीने तयार होणार, यावरच विनोद गंगणे यांचा जय आणि पराजय अवलंबून आहे. शहराच्या राजकारणामध्ये विनोद गंगणे यांनी आजपर्यंत यशाचे राजकारण केले असल्यामुळे येणार्‍या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडून कोणती खेळी होणार आहे, हे देखील पाहणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी न झाल्यास सत्ताधारी लोकांचा विजय सोपा होणार आहे

Back to top button