हनी ट्रॅप…हत्‍या…मृतदेहाचे तुकडे : बांगलादेश खासदार हत्‍या प्रकरणाला नवे वळण | पुढारी

हनी ट्रॅप...हत्‍या...मृतदेहाचे तुकडे : बांगलादेश खासदार हत्‍या प्रकरणाला नवे वळण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बांगलादेशमधील अवामी लीग पक्षाचे खासदार अन्वारुल अझीम अनार कोलकाता येथे खून झाल्‍याची माहिती समोर आल्‍याने एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात ‘हनी ट्रॅप’चा ( एखाद्या व्यक्तीला सुंदर स्त्रियांच्या मोहात पाडणे) संशय व्‍यक्‍त होत आहे . हत्‍येनंतर त्‍यांच्‍या मृतदेहाचे तुकडे करण्‍यात आले. त्‍याला हळद पावडर लावून ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरुन त्‍याची विल्हेवाट लावण्यात आल्‍याचा संशयही पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

हनी ट्रॅप करून कोलकाता येथे बोलावले

अन्वारुल अझीम अनार ते काही दिवसांपूर्वी पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे उपचारासाठी आले होते. पश्‍चिम बंगाल पोलिसांनी संशय व्‍यक्‍त केला आहे की, खासदार अन्वारुल यांना हनी ट्रॅप करून कोलकाता येथे बोलावले होते, जिथे त्याची हत्या करण्यात आली. या हत्येमागे खासदार अन्‍वारुल जवळच्या मित्राचा हात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानेच अन्वारुलला हनी ट्रॅपमध्‍ये अडकवले होते.

सीसीटीव्‍ही फुटेजमधून धक्‍कादायक माहिती समोर

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अन्वारुल एका पुरुष आणि महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताना दिसत आहेत. त्यानंतर काही वेळाने फ्लॅटच्या आत गेलेली व्यक्ती बाहेर येताना दिसली. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा फ्लॅटवर जाताना दिसला; पण अन्वारुल अझीम फ्लॅटमधून बाहेर पडताना दिसलेले नाहीत. दोन्ही आरोपी एक मोठी ट्रॉली सुटकेस घेऊन फ्लॅटमध्ये प्रवेश करतानाही सीसीटीव्‍ही फुटेजमधून दिसत आहे.

कट रचून हत्‍या, ५ कोटींची दिली सुपारी?

खासदार अन्वारुल अझीम अनार यांची हत्‍या कट रचून करण्‍यात आली. हनी ट्रॅपबरोबरच यामध्ये एका अमेरिकन नागरिकाच्या भूमिकेचाही तपास पोलीस करत आहेत. अनार यांची हत्‍या झालेल्‍या फ्लॅटचा मालकाचे वास्‍तव्‍य अमेरिकेत आहे. याचाही तपास सुरु आहे. खासदाराच्या जुन्या मित्राने त्यांच्या हत्येसाठी सुमारे 5 कोटी रुपयांची सुपारी दिल्‍याचाही संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

तुकडे करुन मृतदेह केला गायब

पश्‍चिम बंगाल सीआयडी आणि बांगलादेश पोलिसांनी केलेल्‍या तपासात धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. अन्वारुल अझीम अनार यांचा गळा दाबून खून करण्यात आला. यानंतर मारेकऱ्यांनी मृतदेहाची विटंबना केली. मृतेदहाचे तुकडे केले. ते कुजू नये म्‍हणून त्‍याला हळद पावडरही लावण्‍या आली. मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवण्यात ले.सुटकेसमध्‍ये भरुन त्‍यांचा मृतदेह गायब करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या घृणास्पद कृत्याचा कोणताही पुरावा राहू नये म्‍हणून वॉशरूम ॲसिड वापरून पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले होते. मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या कसाईला अटक करण्यात आली आहे.

 

 

Back to top button