सोलापूर : दक्षिण तालुक्यात निम्म्या पेरण्या प्रलंबित | पुढारी

सोलापूर : दक्षिण तालुक्यात निम्म्या पेरण्या प्रलंबित

दक्षिण सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा :  दक्षिण सोलापूर तालुक्यात गत सहा दिवसांपासून पावसाच्या पुनर्वसु नक्षत्राची संततधार सुरूच आहे. पूर्वी तालुक्यात 55 टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. पुनर्वसु नक्षत्र निघाल्यापासून दररोज पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पेरणीला वाफसा मिळत असल्याने राहिलेल्या पेरण्या प्रलंबितच राहिल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतीत आहेत.

सहा दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी म्हणावा तसा दमदार पाऊस झालेला नाही. दिवसभरात 20 ते 28 मि.मी. इतकीच पावसाची नोंद होत आहे. ज्यांनी खरिपाची पेरणी केली आहे, त्यांच्या पिकांना या पावासाचा लाभ होणार आहे. मात्र, ज्यांनी अद्याप पेरणी केली नाही त्यांनादेखील पावासाच्या उघडीपाची आणि वाफसा येण्याची वाट पाहावी लागणार आहे.

जमीन अद्यापही खोलवर भिजलेली नाही. सध्या शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे, अशाच शेतकर्‍यांना खरिपाच्या पेरणीचा लाभ होणार आहे. कारण, जमीन खोलवर न भिजल्याने पेरणीनंतर पिके जगण्याची शाश्‍वती नाही. ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप यामुळे उलट कोंदट वातावरण निर्माण होऊन पिकांवर रोगांचा प्रादूर्भाव होतो. जर जोरदार सरी बरसल्या तर पिकांवरील कीड निघून जाते आणि जमिनीत ओलावादेखील निर्माण होतो. दिवसभराच्या बारीक पावसामुळे शेतातील तण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पिकांऐवजी हे तणच जमिनीतील पोषक घटक संपवितात. मोठ्या प्रमाणात तण वाढते, मात्र पिके वाढत नाहीत. गवतामुळे अळ्या, किडे, नाकतोडे यांचा अधिक त्रास शेतकर्‍यांच्या पिकांना होतो. तण काढण्याचा खर्चदेखील वाढणार आहे. अनेक शेतकर्‍यांनी खरीप पेरणीसाठी रान तयार करून ठेवले होते. मात्र, समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या.

तालुक्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र 21 हजार 168 हेक्टर आहे. आतापर्यंत 18 हजार 665 हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत. अद्याप निम्या खरिपाच्या पेरण्या होणे बाकी आहे. सध्या राज्यात इतरत्र धो-धो पाऊस जरी सुरू असला तरी दक्षिणमध्ये शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

दमदार पावसाची अपेक्षा
दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, हा पाऊस पेरणीयोग्य नसून अद्यापही शेतकर्‍यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. हा पाऊस पुढील काळात विहीर, बोअरवेलसाठी फायदेशीर असणार आहे. मात्र, पेरणी करण्याइतपत पाऊस नसल्याचे शेतकर्‍यांतून बोलले जात आहे.

Back to top button