सोलापूर : वारी झाली, आता ‘मिशन इलेक्शन…!’ | पुढारी

सोलापूर : वारी झाली, आता ‘मिशन इलेक्शन...!’

सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात नुकतीच आषाढी वारी पार पडली आहे. वारीनिमित्त सर्वच अधिकारी गुंतले होते. तोपर्यंत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील नऊ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी आता वारीच्या कामातून सुटकेचा श्‍वास सोडला आहे. तोपर्यंतच निवडणुकांच्या कामाची लगबग सुरू झाली आहे.त्यामुळे अधिकार्‍यांना आता ‘मिशन इलेक्शन’साठी सज्ज राहावे लागणार आहे.

जिल्ह्यातील अक्कलकेाट तालुक्यातील दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोट या नगरपरिषदा, तर मोहोळ तालुक्यताील मोहोळ, अनगर, कुर्डूवाडी, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस या नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये गेल्या 7 जुलै रोजीच निवडणुकांसाठीच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.22 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी या निवडणुकांचा कार्यक्रम जिल्हास्तरावर जाहीर करणार आहेत.

यामध्ये 22 जुलै ते 28 जुलैदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, तर 23 जुलै ते 24 जुलै रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहेत. 29 जुलैपर्यंत आलेल्या वैध नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. 4 ऑगस्ट रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत असणार आहे. 18 ऑगस्ट रोजी यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. 19 ऑगस्टला यासाठी मतमोजणी होणार आहे.

विविध राजकीय पक्षही आता या निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी अनेकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य होते. मात्र आता शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सेना कमकुवत झाली आहे. दुसरीकडे भाजपने ग्रामीण भागातही आता जोर धरला आहे. त्यामुळे यंदा या निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

20 जुलैपर्यंत नेमणुका
जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. यासाठी आरक्षण सोडत आणि प्रभाग रचनेचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे तसेच मतदार याद्याही तयार आहेत. त्यामुळे लवकरच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नेमणुका करण्यात येतील. या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडल्या जातील, असा विश्‍वास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यक्‍त केला आहे.

Back to top button