मंगळवेढा भूमी संतांची | पुढारी

मंगळवेढा भूमी संतांची

मंगळवेढा हे तीर्थक्षेत्र पंढरपूरपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. मंगळवेढा येथे संत चोखोबांचे निर्वाण स्थान, संत कान्होपात्रा मंदिर व संत दामाजीपंत समाधी मंदिर आहे. यामुळे मंगळवेढ्याला ‘संतांची भूमी’ म्हटले जाते.

गावाच्या वेशीचे बांधकाम करण्यासाठी चोखोबांना मंगळवेढ्याला बोलावण्यात आले होते. वेशीचे बांधकाम चालू असताना अपघातात बांधकाम कोसळून चोखोबांचे निर्वाण झाले. नंतर नामदेवरायांनी त्यांच्या अस्थी पंढरपूरला नेल्या व तेथे त्यांची समाधी बांधली. मंगळवेढा येथेसुद्धा चोखोबांचे छोटेसे स्मृती मंदिर आहे.

कवडे यांचे कान्होपात्रा मंदिर असून त्याचे व्यवस्थापन डांगे परिवाराकडे आहे. आप्पासाहेब पुजारी यांनी बांधलेले कान्होपात्रा स्मारक मंदिरसुद्धा मंगळवेढा येथे आहे.

दामाजीपंत हे बादशहाच्या पदरी असलेले वतनदार मंगळवेढा येथे राहत होते. शेतकर्‍यांकडून सारा वसूल करायचा, त्याचा हिशेब ठेवायचा, तो सरकारी कोठारामध्ये जमा करायचा व सरकारला हिशेब सादर करायचा हे त्यांचे काम होते. ते वारकरी होते. नेमाने पंढरीची वारी करत असत. एके वर्षी या भागामध्ये मोठा दुष्काळ पडला. अन्नपाण्याविना लोकांचे जीव जाण्याची वेळ आली. तेव्हा त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर सरकारी धान्याचे कोठार उघडले व सर्वांना तेथून हवे तेवढे धान्य घेण्याची मुभा दिली. अर्थात, त्यांचा हा परोपकार विरोधकांना व बादशहाला पटण्यासारखा नव्हता. त्याचा परिणाम म्हणून त्यांना पकडून नेण्यात आले. तेव्हा पांडुरंगाने त्या धान्याची रक्कम भरून त्यांना सोडवले, अशी आख्यायिका आहे.

दामाजीपंतांची समाधी मंगळवेढा येथे आहे. येथून दामाजीपंतांची पालखी पंढरपूरला जाते. आषाढ शुद्ध अष्टमीला पालखीचे प्रस्थान होते. पालखी ठेवायला छोटी गाडी असते. ही गाडी हाताने ओढतात. सोबत संस्थानची एकच दिंडी असते. ही दिंडी बजरंग माळी महाराज चालवतात. सकाळी पादुकांची पूजा, दुपारी विसाव्याच्या ठिकाणी पंगतीवाल्यांतर्फे नैवेद्य, रात्री कीर्तन इ. कार्यक्रम होतात. अष्टमीचा मुक्काम एलकंचपूर येथे, तर नवमीचा मुक्काम वाखरी येथे असतो. तेथून दशमीला पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करते.

पंढरपूरमध्ये पालखीचा मुक्काम संभाजी चौकातील दामाजी मठामध्ये असतो. एकादशीला दिंडीसह नगरप्रदक्षिणा व चंद्रभागा स्नान होते. पौर्णिमेला पालखी गोपाळपूरला काल्यासाठी जाते. काला झाला की, गोपाळपूरवरूनच पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो. पौर्णिमेच्या रात्री पालखी मंगळवेढ्याला पोहोचते व सोहळ्याची सांगता होते.

अभय जगताप

Back to top button