पंढरपूर : विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे करणार  | पुढारी

पंढरपूर : विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे करणार 

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर राजीनामा दिला. आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना भाजपने एकमताने पाठिंबा दिल्याने ते मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. त्यामुळे आषाढी एकादशीला शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच मिळणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडीत विठुरायाची शासकीय महापूजा उद्धव ठाकरे करणार की देवेंद्र फडणवीस करणार, या रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरवर्षी आषाढी सोहळ्यातील शासकीय महापूजेचा 

मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो. अपवादात्मक परिस्थिती वगळता इतर सर्वच वेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी सोहळ्यातील महापूजा मोठ्या भक्तीभावाने पार पडल्या आहेत. अनेक वेळा राज्यातील विविध प्रश्‍न घेवून मुख्यमंत्र्यांना या महापुजेपासून रोखण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्ष व संघटनाकडून होत असल्याने आषाढी सोहळा कालावधीमध्ये या महापुजेबाबत नेहमीच राजकीय फड रंगल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे प्रत्येक आषाढी सोहळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा महत्वपूर्ण घटना ठरत असते.

कोरोनानंतर दोन वर्षांनी आषाढी सोहळा भरत असल्याने मोठया भक्ती भावाने व भाविकांच्या वाढत्या संख्येने हा सोहळा साजरा होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पुन्हा आषाढी यात्रा एकादशीची शासकीय महापूजा करण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे येत्या 10 जुलै रोजी श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार हो निश्‍चित आहे.

Back to top button