धनंजय मुंडे : मराठवाड्यातून ऊस आणून ‘गोकुळ’ने शेतक-यांना दिला दिलासा | पुढारी

धनंजय मुंडे : मराठवाड्यातून ऊस आणून ‘गोकुळ’ने शेतक-यांना दिला दिलासा

हंजगी (सोलापूर), पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊन शेतकरी अडचणीत असताना गोकुळ शुगरने मराठवाड्यातून ऊस आणून शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे. त्‍याबाबत आभार व्यक्त करण्यासाठी गोकुळच्या गाळप हंगाम सांगता समारंभ पार पडला. दक्षिण सोलापूर धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रिज लि. यंदाच्या विक्रमी गाळप हंगाम यशस्वीरित्या पुर्ण केल्‍याबद्दल कारखानास्थळावर भव्य शेतकरी स्नेहमेळावा, कृषी प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, भगवान राव शिंदे यांच्या निधनानंतर कारखान्यावर अनेक संकट आले. अशा संकटावर मात करत यंदा गोकुळ शुगरने सात लाख 71 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करुन कारखाना नावारुपाला आणणे हे सामान्य काम नाही. सर्व पक्षात शेतक-यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे सांगितले. भाजप सरकारच्या काळात कर्जमाफी देण्यासाठी पाच वर्षे लागले, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच पंधरा दिवसात दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली. त्याच बरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतक-यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे मंत्रीमंडळात निर्णय झाला, असे मुंडे म्हणाले.

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण बोलताना म्हणाले की, यापुढे कारखाना चांगल्या प्रकारे चालण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करुच. चांगल्या कामाची जबाबदारी घेणे हे आमचे काम आहे.

चेअरमन दत्ता शिंदे म्‍हणाले, कारखाना अडचणीत असताना यावर्षी उत्कृष्ट नियोजन करून गोकूळ शुगरने विक्रमी गाळप केला आहे. तसेच कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात शेतकऱ्यांना दिलेला विश्वास आणि गाळपाचे उद्दिष्ट सहजरीत्या पूर्ण करता आले. त्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानण्यासाठी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच 140 कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी आमदार संजयमामा शिंदे,माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील,लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष पवार, ज्येष्ठ नेते बलभिम शिंदे, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे, यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा  

Back to top button