शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी किसान आयोग स्थापणार : राहुल गांधी

राहुल गांधी
राहुल गांधी

अमरावती/सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशातील 22-25 लोकांचाच विचार केला. मात्र, आम्ही देशातील सर्वच घटकांना न्याय देऊन त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणार आहोत. इंडिया आघाडी सरकारमध्ये गोरगरीब महिलांकरिता महालक्ष्मी योजना, बेरोजगार युवकांसाठी अ‍ॅप्रेंटिसशिपचा अधिकार, तर शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी किसान आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी बुधवारी अमरावतीत केली.

जिल्ह्यातील परतवाडा येथे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सोलापूरच्या 'मविआ'च्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढातील उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सोलापुरातही सभा झाली. संविधान हा केवळ एक ग्रंथ नाही, तर ते गरिबांचे हत्यार आहे. मात्र, नरेंद्र मोदी हे हत्यार 22-25 लोकांना हाताशी धरून संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या ज्यावेळी मी हा मुद्दा उपस्थित करतो, त्यावेळी पंतप्रधान मोदी जनतेचे लक्ष कधी पाकिस्तान, तर कधी चीन अशा अन्य मुद्द्यांकडे वळवतात, अशी टीका राहुल गांधी यांनी अमरावतीत केली.

ते म्हणाले की, राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या आहेत. मात्र, त्या भारताच्या राष्ट्रप्रमुखही आहेत. त्यांना श्रीराम मंदिरातही जाऊ दिले नाही आणि संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावेळीही प्रवेश करू दिला नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आदिवासींना भाजपचे लोक वनवासी म्हणतात. मात्र, ते आदिवासीच आहेत. आदिवासी म्हणजे भारताचे मूळ नागरिक. देशाचा एक्स-रे म्हणजेच जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे, आमचे सरकार आल्यास जातनिहाय जनगणना करण्यात येईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मोदी सरकार हे गरिबांविरोधी आणि संविधानविरोधी आहे. त्यांनी फक्त श्रीमंत आणि विशिष्ट वर्गासाठीच काम केले. नोटाबंदी, जीएसटी, कृषी कायदा हे विशिष्ट लोकांसाठी घेतलेले निर्णय आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

सभेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आ. यशोमती ठाकूर, प्रकाश पोहरे, अकोला लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील; तर सोलापुरातील सभेवेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आ. नरसय्या आडम आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news