रत्नागिरी : अणुस्कुरा मार्गावर दुचाकी - टेम्पोच्या धडकेत दोन ठार | पुढारी

रत्नागिरी : अणुस्कुरा मार्गावर दुचाकी - टेम्पोच्या धडकेत दोन ठार

राजापूर ; पुढारी वृत्तसेवा : ओणी अणुस्कुरा मार्गावर येळवण आणि खडीकोळवण दरम्यानच्या खिंडीत दुचाकी आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोघेजण जागीत ठार झाले. ही घटना शनिवारी (दि.२१) दुपारी दीडच्या सुमारास घडली. सिराज मुश्ताक नाईक (वय २२) आणि मोहम्मदसाहेब अल्लीसाहेब मापारी (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर टेम्पोचा चालक पसार झाला.

सौदळ मुस्लीमवाडी येथे एक लग्न समारंभ होता. जेवणाच्या टेबलवरील कापड आणण्यासाठी मोहम्मदसाहेब अलीसाहेब मापारी आणि सिराज मुश्ताक नाईक हे दोघेजण दुचाकीवरुन (एम एच ०८,एच ५६०४) पाचलला गेले होते. दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ते येळवण, खडीकोळवण दरम्यान असलेल्या खिंडीत आले असता अचानक समोरुन आलेल्या टेम्पोची (नंबर एमएच ०४,एक्स एल ६१५५ ) आणि त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात ते दोघेजण जागीच ठार झाले.

राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जनार्दन परबकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करण्यात आला. दोन्ही मृतदेह रायपाटण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. डीवायएसपी निवास साळोखे घटनास्थळी दाखल झाले.

राजापूर तालुक्यातील सौंदळ परिसरात एक क्रशर सुरु आहे. तेथून दररोज खडीची वाहतूक डंपरद्वारे होत असते. हे डंपर भरधाव असतात. त्यातच ओणी – अणुस्कुरा या मार्गाची चाळण झाली आहे. त्यातूनच भरधाव डंपरची ये-जा सुरू आहे. तर, या मार्गावरील वाढलेली झाडेझुडपेही अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत. याबाबतच्या तक्रारी वाहनधारकांतून केल्या जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button