सोलापुरात पाणीपुरवठ्याचा घोळ | पुढारी

सोलापुरात पाणीपुरवठ्याचा घोळ

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा :  अक्षय्यतृतीया, बसव जयंती, रमजान ईद आणि परशुराम जयंती एकत्र आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहेे. अशातच सोलापुरातील काही भागांत मंगळवारी पाणीपुरवठा करण्याचा दिवस होता. मात्र, दिवसभर पाणी न आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ऐन सणातच पाण्याचा घोळ झाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पुणे रस्त्यावरील पाकणी येथील जलशुद्धिकरण केंद्रात बिघाड झाल्याने पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय आला. सण असल्याने मंगळवारी पाणी लवकर येईल, या आशेने नागरिकांनी घरात भरून ठेवलेले बॅरेल, हौदासह अन्य साहित्य रिकामे केले. त्यानंतर पाण्याची वाट पाहत थांबावे लागले. पाणी न आल्याने त्यांना बोअर, हातपंपाचा आधार घ्यावा लागला. ज्यांच्याकडे ही सोय नाही, त्यांनी चक्क टँकरचे पाणी विकत घेतले. सण, उत्सव असल्याने नातेवाईक आणि पाहुण्यांचा घरात राबता होता. अशात कडक ऊन आणि पाण्याचा पत्ता नसल्याने गृहिणींची चांगलीच तारांबळ उडाली. विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याचा फटका प्रभाग क्र. 7 मधील दत्त चौक, चौपाड, निराळे वस्ती, जुनी पोलिस लाईन, खमितकर अपार्टमेंट, यशनगर, उमा नगरी, आवंतीनगर, जुना पुना नाका, पाटील वस्ती, दमाणी नगरसह पश्चिम सोलापूर भागात असलेल्या नागरी वसाहतीला बसला.
आज, उद्या पुन्हा उशिरा पाणीपुरवठा टाकळी हेड वर्क्स येथे नवीन पंंपिंग मशिन बसविण्याचे काम सुरू आहे. यामुळे बुधवारी (दि.4 ) 12 ते 15 तास शटडाऊन असणार आहे. यामुळे पुढील दोन दिवस उशिरा पाणीपुरवठा होणार आहे. शटडाऊनमुळे एक रोटेशन पाणीपुरवठा पुढे जाणार आहे. याचा परिणाम शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा 4 व 5 मे रोजी उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार आहे.

दिवस उशिरा पाणीपुरवठा होणार आहे. शटडाऊनमुळे एक रोटेशन पाणीपुरवठा पुढे जाणार आहे. याचा परिणाम शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा 4 व 5 मे रोजी उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार आहे.

मोदी परिसरात गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी

मोदी परिसरामध्ये पाच दिवसानंतर रात्री सव्वाबारा वाजता गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. रात्री पाणी आल्याने अक्षय्य तृतीया, रमजान ईदच्या तयारीत असलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला. गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये यासाठी काहीच तरतूद करण्यात आली नाही. यंदाही याचा विचारच झाला नाही. यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. सुरुवातीला 15 मिनिटे असे घाण पाणी येत आहे, त्यानंतर थोडावेळ चांगले पाणी मिळते, पण या पाण्यालाही गटारीचा वास असतोच. याबाबत झोन अधिकार्‍यांकडे तक्रार केली असून, हा प्रकार तत्काळ थांबवून नागरिकांचे आरोग्य जपावे, अशी मागणी रहिवाशी नझीर शेख यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

Back to top button