सोलापूर :  नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आरोग्यदूत | पुढारी

सोलापूर :  नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आरोग्यदूत

करमाळा : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तमाम महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांचा आधारस्तंभ ठरत असून या मदत कक्षातून शाश्वत मदत मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. या प्लॅटफॉर्मचे जनक नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आरोग्यदूत ठरत आहेत, असे मत शिवसेना नेत्या रश्मी बागल यांनी व्यक्त केले.

आरोग्याच्या महायज्ञाच्या दुसर्‍या दिवसाचे शिबिराचे उद्घाटन रश्मी बागल यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल, पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे, जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील, प्राचार्य जयप्रकाश, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रियंका गायकवाड, बीड जिल्ह्याचे शिवसेना वैद्यकीय पक्षाचे संपर्कप्रमुख बाजीराव जाधव, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहायक निबंधक दिलीप तिजोरी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश कांबळे, लक्ष्मण भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना रश्मी बागल यांनी करमाळा तालुका आरोग्य क्षेत्रात मागे असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांनी तालुक्यात मोठ्या हॉस्पिटलची उभारणी करून मोफत उपचार देण्याची सोय करावी, अशी मागणी केली.

यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे कोरोना काळात रुग्णांची सेवा झाली. 80 टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण या स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या दिशेनेच शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे काम सुरू आहे, नक्कीच भावी काळात करमाळा ब्लड बँक व अत्यंत स्वस्त दरात किंवा कॅशलेस हॉस्पिटलची उभारणी करण्यासाठी आपण प्रयत्न करू, मात्र त्यासाठी सर्व नेतेमंडळींनी योगदान देणे गरजेचे आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोनवरून आरोग्य शिबिराला शुभेच्छा दिल्या.

मोफत आरोग्य सुविधा

या आरोग्य शिबिरामध्ये तेराशे साठ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तर 765 रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. सुमारे 5 लाख रुपयांचे औषध वाटप वाटण्यात आले. जवळपास 160 रुग्णांची हृदय तपासणी करण्यात आली. यापैकी 30 रुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीची गरज असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व रुग्णांना मोफत उपचार वाई येथील माणसे हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहेत.

 

Back to top button