karad police : पोलिसांकडून गुन्हेगारांचा सिनेस्टाईल थरारक पाठलाग | पुढारी

karad police : पोलिसांकडून गुन्हेगारांचा सिनेस्टाईल थरारक पाठलाग

कराड; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर येथील मोठ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराचा सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पोलीस कर्मचाऱ्यांनी ( karad police ) सिनेस्टाईल पाठलाग केला. यावेळी धावत्या इनोवा कार मधून संशयिताला दरवाजा उघडून बाहेर ओढण्याच्या प्रयत्नात पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी घसरल्याने पोलिस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, संशयिताने विद्यानगर येथे समोर पोलिस दिसताच कार भर रस्त्यात सोडून गर्दीचा फायदा घेत तिथून पोबारा केला. गुरुवारी (दि.६) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा होती. साबिर मुल्ला असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार विटा बाजूकडून कराडकडे येत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस कर्मचारी साबिर मुल्ला यांना गोपनीय बातमी दाराकडून समजली. तसेच संशयिताजवळ पिस्तूल व इतरही अनेक संशयास्पद साहित्य असल्याचेही समजल्याने कोणताही वेळ न घालवता साबिर मुल्ला यांच्यासह मयूर देशमुख हे दोघेजण दोन दुचाकीवरून त्वरित संशयितांना पकडण्यासाठी रवाना झाले. ( karad police )

त्याच दरम्यान विटा बाजूकडून भरधाव वेगात इनोवा कार आल्याचे त्यांच्या लक्षात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री केल्यानंतर साबिर मुल्ला व मयूर देशमुख यांनी दुचाकीवरून इनोवा कारचा पाठलाग सुरू केला. कृष्णा कॅनॉलजवळ आल्यानंतर साबिर मुल्ला यांनी धावत्या दुचाकीवरूनच इनोवा कारचा दरवाजा उघडून संशयित चालकाला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान इनोवा कार चालकाने झटका देऊन स्वतःला साबिर मुलाच्या हातातून सोडवून घेत तेथून भरधाव वेगात पलायन केले. तर अचानक झटका बसल्याने साबिर मुल्ला यांची दुचाकी घसरली व ते जमिनीवर पडून जखमी झाले. संशयितांनी याचा फायदा घेत तेथून पोबारा केला. ( karad police )

मयुर देशमुख व इतर नागरिकांच्या मदतीने साबिर मुल्ला यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, संशयितांनी भरधाव वेगात इनोवा कार कृष्णा कॅनॉलवरून विद्यानगर मार्गे पुढे जाण्याचा प्रयत्न केला. विद्यानगरमधील साई गार्डन समोर कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी थांबले होते. संशयितांना पुढे पोलिस असल्याचे दिसताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता रस्त्यात मध्येच इनोवा कार उभा करून तेथून गर्दीचा फायदा घेत पलायन केले.

कार मधीच रस्त्यात उभा केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी का झाली आहे म्हणून पाहिले असता त्यांना रस्त्यात मध्येच कार उभा असल्याची दिसली. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून कारची झडती घेतली असता त्यामध्ये कपडे सापडले. पोलिसांनी ताब्यात घेतली कार पंढरपूर येथील व्यक्तीचे असून ती त्याने आटपाडी येथील एक जणाला विकली असल्याची माहिती समोर येत आहे. याची पोलिसांकडून खात्री करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

एलसीबीचे कराडमधील अस्तित्व व गुन्हेगारांवर वॉच… ( karad police )

पळून गेलेले संशयित कोण होते ? त्यांनी इनोवा कार रस्त्यात मध्येच सोडून जाण्याचे कारण काय ? ते कोणत्या गुन्ह्यातील संशयित आहेत ? याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अचानक विद्यानगर परिसरात घडलेल्या या सिनेस्टाईल घटनेने खळबळ उडाली आहे. यामुळे सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे कराडमधील अस्तित्व अधोरेखित होत आहे. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांनुसार एलसीबीचा गुन्हेगारांवर वॉच असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button