सेवा करावी लागते म्हणून आजारी आईचा खून | पुढारी

सेवा करावी लागते म्हणून आजारी आईचा खून

मायणी; पुढारी वृत्तसेवा : अर्धांगवायू झालेल्या आईची सेवा करायला लागते, दवाखान्याचा खर्चही करावा लागत असल्याच्या कारणातून पडळ (ता. खटाव) येथे मुलानेच दारूच्या नशेत जन्मदात्या आईचा डोक्यात वीट घालून आणि दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे. शांताबाई नारायण वाघमारे (वय 90) असे मृत आईचे नाव आहे; तर अंकुश नारायण वाघमारे (वय 45, रा. पडळ) असे अटक केलेल्या नराधम मुलाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शांताबाई यांचे वय झाल्याने त्या गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्या अंथरुणाला खिळून असल्याने त्यांची सेवा मुलगा अंकुश याला करावी लागत होती. तसेच त्यांच्या दवाखान्याचा खर्चही मोठा होत होता. त्यातच मुलगा अंकुश हा वारंवार मद्यपान करून घरच्यांना त्रास देत होता. यातून आई व मुलगा या दोघांमध्ये खटके उडत होते.

रविवारी दुपारी अंकुश हा घरामध्ये दारू पिऊन आला होता. यावेळी आई शांताबाई या अंथरुणावर पडल्या होत्या. आईची सेवा करणे आणि दवाखान्याचा खर्च या गोष्टींवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद टोकाला गेल्यानंतर अंकुश याने रागाच्या भरात आईच्या डोक्यात वीट घातली. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. आई जखमी झाल्यानंतरही अंकुशचा राग संपला नाही. त्याने दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला.

पोलिस पाटील सकट यांनी वडूज पोलिसांना खून झाल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून संशयित अंकुश वाघमारे याला ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनेचा अधिक तपास सपोनि अमोल माने करत आहेत.

निनावी फोनमुळे संशयित जाळ्यात

आई व मुलाचा वाद सुरु असतानाच वडूज पोलिसांना डायल 112 वर निनावी फोन आला. त्या व्यक्तीने पडळ येथे आई व मुलामध्ये जोरात वाद सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पडळचे पोलिस पाटील संतोष सकट यांना याची कल्पना दिली. पोलिसांनी सांगितल्यानंतर सकट हे अंकुश याच्या घरी गेले. त्यावेळी शांताबाई यांचा अंकुशने खून केल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी तेथे अंकुशची पत्नी सुवर्णा वाघमारे व शेजारी जमा झाले होते.

Back to top button