सातारा : विस्तारवाढीचा छोट्या कारखान्यांना दणका; उसाची होणार पळवापळवी | पुढारी

सातारा : विस्तारवाढीचा छोट्या कारखान्यांना दणका; उसाची होणार पळवापळवी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांनी गतवर्षी दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ केली आहे. त्यामुळे या कारखान्यांना यंदाच्या हंगामापासून जास्त ऊस लागणार आहे. हा ऊस गोळा करण्यासाठी उसाची मोठ्या कारखान्यांकडून पळवापळवी होणार आहे. याचा दणका छोट्या कारखान्यांना बसणार आहे. यंदाची उसाची झालेली लागवड व कारखान्यांची वाढलेली क्षमता याचा विचार करता यंदाचा हंगामही लवकर आटोपण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारने साखर उद्योगाच्या हिताचे बरेच निर्णय घेतले आहे. त्यामुळेच राज्यासह जिल्ह्यातील कारखानदारी तरली आहे. त्यामुळेच राज्यात अनेक नवीन कारखाने उभा राहत आहेत. तसेच अनेक कारखान्यांकडून गाळप क्षमतेत वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इथेनॉलला मागणी वाढल्याने इथेनॉल प्रकल्पही बसवले जात आहेत. विस्तारवाढ व नवीन प्रकल्प होत असल्याने उसाची मागणी वाढणार आहे. परंतु, त्या तुलनेत यंदाच्या हंगामात उसाची लागवड झालेली नाही. गतवर्षीही हंगाम इनमीन 120 दिवस चालला होता.

यंदा जिल्ह्यातील श्रीराम, कृष्णा, लोकनेते बाळासाहेब देसाई, सह्याद्री, अजिंक्यतारा, दत्त इंडिया, जरंडेश्वर, शरयू आणि जयवंत शुगर या साखर कारखान्यांनी अडीच हजार ते साडे सात हजार टनाने क्षमता वाढवली आहे. या 9 कारखान्यांची एकूण क्षमता तब्बल 52 हजार टन प्रति दिन इतकी वाढली आहे. त्यामुळे हे कारखाने दुसर्‍या कारखान्यांच्या हद्दीतून ऊस ओढून आणणार आहे. यातील बहुतांश कारखान्यांकडे इथेनॉलचे प्रकल्प आहेत. इथेनॉलसाठी लागणारी मळी खरेदी करावी लागू नये, यासाठी अनेक कारखाने उसाची पळवापळवी करणार आहे.

गाळप क्षमतेत वाढ झाली असली जिल्ह्यातील उस लागवड मात्र ‘जैसे थे’ आहे. उसाच्या लागवडीचे क्षेत्र न वाढल्यामुळे याचा हंगामावर परिणाम होणार आहे. गतवर्षी उस नसल्याने महिनाभर अगोदरच हंगाम आटोपला होता. त्यामुळे अनेक कारखान्यांचे उद्दिष्टही पूर्ण झाले नव्हते. यंदाही तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरात चढाओढ लागणार का?

तब्बल 9 कारखान्यांनी क्षमता वाढवल्याने दैनंदिन उसाची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्यांना लागणार आहे. उसाची कमी झालेली लागवड आणि वाढलेली क्षमता यामुळे कारखान्यांमध्ये रस्सीखेच होणार आहे. गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्यांना मेहनत करावी लागणार आहे. यामधून शेतकर्‍यांचा फायदा होऊन विस्तारवाढ केलेल्या कारखान्यांमध्ये दराची चढाओढ लागणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Back to top button