कोल्हापूर: यड्राव येथे भीषण अपघातात महिला ठार; १० जण जखमी 

कोल्हापूर: यड्राव येथे भीषण अपघातात महिला ठार; १० जण जखमी 
Published on
Updated on

यड्राव : पुढारी वृत्तसेवा :  शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे तवेरा चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. ही घटना आज (दि.१३) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. लालबी कलबुर्गी (रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव आहे. तारदाळ येथील संगमनगर मधील सनदी कुटुंबातील सर्व जखमी असल्याचे समजते. जखमींना सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे मार्गावर तासभर वाहतूक ठप्प झाली होती.

नेमका अपघात कसा झाला?

  • तारदाळ येथील सनदी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होते.
  • नाईक निंबाळकर सेवा सोसायटी समोरील ओढ्याजवळ चालकाचा ताबा सुटला
  • गाडी चार पलटी मारत रस्त्याकडेच्या ओघळीमध्ये पडली.
  • गाडीतील लालबी यांचा जागीच मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, तारदाळ येथील सनदी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होते. नाईक निंबाळकर सेवा सोसायटी समोरील ओढ्याजवळ तवेरा कारवरील  (एम.एच.12 ई.एम.7422) चालकाचा दुसऱ्या वाहनाला चुकविताना ताबा सुटला. यामुळे गाडी तीन चार पलटी मारत रस्त्याकडेच्या ओघळीमध्ये पडली. यावेळी मोठा आवाज झाला. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लालबी यांचा रक्तस्त्राव अधिक झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार महिलांच्या डोक्याला, हाताला, पायाला, कमरेला मोठी दुखापत झाली.

या अपघातात पाच मुलेही जखमी झाले आहेत

या अपघातात पाच मुलेही जखमी झाले आहेत. त्यांच्याही डोक्याला, हाताला, पायाला, दुखापत झाली आहे. या सर्वांना रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहापूर पोलीस तब्बल पाऊण तासानंतर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.

पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. यावेळी मृतदेह व जखमींना पाहून अनेकांनी हंबरडा फोडला. सनदी कुटुंबीय यापूर्वी  रेणुकानगर, यड्राव येथे राहत असल्यामुळे या परिसरातील अनेक नागरिकांनी  त्यांना ओळखले. या घटनेमुळे उपस्थित नागरिकांतून हळहळ व्यक्त होत होती.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news