सातारा : कास पुष्प पठारावर आता तंगुसाच्या जाळीचे कुंपण | पुढारी

सातारा : कास पुष्प पठारावर आता तंगुसाच्या जाळीचे कुंपण

बामणोली; पुढारी वृत्तसेवा :  जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावर असणारी जैवविविधता व विविध प्रजातींच्या फुलांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने आता तंगुसाच्या जाळीचे कुंपण बसविण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी पावसाने सुरुवात केल्याने कास परिसरात फिरायला जाणारे पर्यटक वाढले. फुलांच्या संवर्धनासाठी घालण्यात आलेल्या तारेच्या जाळीचे कुंपण काढल्याने फिरायला गेलेले पर्यटक कास पठारावर जेथे फुले येतात त्या भागात सैरावैरा फिरू लागले होते. याबाबत दै. पुढारीने आवाज उठवल्यानंतर कास पठार कार्यकारी समिती व उप वन संरक्षक महादेव मोहिते यांच्या उपस्थितीत हंगाम नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत तंगुसाचे कुंपण बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही माहिती समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी दिली. कास पुष्प पठारावर रस्त्याच्या बाजूला साधारणपणे चार ते सहा किलोमीटर लांब व चार मीटर उंच असे हे तंगसाच्या जाळीचे कुंपण लवकरच बसवण्यात येणार आहे. यासाठी सुमारे आठ ते दहा लाख रुपये खर्च केला जाणार आहे. केवळ हंगाम कालावधीपुरते मर्यादित हे कुंपण दरवर्षी घातले जाणार आहे.

Back to top button