कराड : मांडूळ व कासव विक्रीप्रकरणी चौघांना अटक | पुढारी

कराड : मांडूळ व कासव विक्रीप्रकरणी चौघांना अटक

कराड; पुढारी वृत्तसेवा : मांडूळ व कासव विक्री प्रकरणी वन विभागाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून कासव व मांडूळ हे वन्यजीव तसेच दोन दुचाकी व चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवार दि. 17 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास कराड-विटा रस्त्यावरील राजमाची -ओगलेवाडी (ता. कराड) येथील सांज-सावली हॉटेलमध्ये ही कारवाई केली. रोहित साधु साठे, (वय 20), प्रशांत रामचंद्र रसाळ (20), अविनाश आप्पा खुडे ( 21, तिघेही रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व सुनील तानाजी सावंत (28, रा. दिवड, ता. माण, जि. सातारा) अशी वनविभागाने अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही लोक कराड (राजमाची-ओगलेवाडी) येथे जिवंत वन्यजीव मांडूळ व कासव घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती रविवारी सकाळी मिळाली. त्यानुसार वनविभागाने सापळा लावला. दुपारी 1.30 वाजता 4 संशयित हे दोन दुचाकीवरून राजमाची(ओगलेवाडी) येथे आले असून सांज-सावली हॉटेलमध्ये जेवण करीत असल्याचे समजले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मानद वन्यजीव रक्षक यांनी हॉटेलमध्ये जाऊन संशयित 4 जणांची तपासणी करत त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्या जवळ एका पिशवीत जिवंत कासव व एका पिशवीत जिवंत मांडूळ आढळून आले. त्यामुळे संशयितांना ताब्यात घेऊन मलकापूर येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश  झांजुर्णे, मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनपाल ए. पी. सावखंडे, बाबुराव कदम, वनरक्षक  उत्तम पांढरे, विजय भोसले, रमेश जाधवर, अरुण सोलंकी, वनपाल कोळे, सचिन खंडागळे, श्रीकांत चव्हाण,  हणमंत मिठारे, सुनीता जाधव, दीपाली अवघड, शीतल पाटील व वनकर्मचारी या कारवाईत  सहभागी झाले होते.

वनविभागाला महिती कळविण्याचे आवाहन…

कासव हे इंडियन सॉफ्ट शेल्ड टरटल (कासव) व कॉमन सॅनड बोआ (मांडूळ) हे प्राणी वन्यजीव (संरक्षण)अधिनियम 1972 अंतर्गत शेड्युल 1 भाग 2 व शेड्युल 4 मध्ये येतात. त्याला पकडणे, बाळगणे, विक्री करणे, मारणे हा वन्यजीव कायद्याने गुन्हा आहे. असे कोणी करीत असेल तर त्याची गोपनीय माहिती 1926 या नंबर वर कळवावी, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी व वनविभागने केले आहे.

Back to top button